अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बीएसएनएल विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

लँडलाइन - ७० हजार
ब्रॉडबँड कनेक्‍शन - १ लाख

कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ग्राहकसेवांमध्ये विस्कळितपणा आला असला, तरी महिनाभरात त्या पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 
- भरत सोनवणे, सहायक महाप्रबंधक

पिंपरी - बीएसएनएलच्या ६५ टक्के कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे शहरातील ग्राहकसेवा विस्कळित झाली आहे. या कामाचे आउटसोर्सिंग केले असले, तरी ते अपूर्ण असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे बिल भरण्यासाठी रांगा लागत आहेत. ही विस्कळित झालेली सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड परिसरात बीएसएनएलमध्ये काम करणाऱ्याची संख्या १०० पर्यंत होती. स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर झाल्यानंतर सध्या अवघ्या ३५ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण शहराची मदार असून, त्यामध्ये अधिकाऱ्यांपासून ते लाइनमनचा समावेश आहे. ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांकडील क्षेत्रात वाढ केली आहे. लँडलाइन फोन दुरुस्त करण्यासाठी सध्या अवघे २० लाइनमन शिल्लक राहिले आहेत. 

एचए' कंपनीला 'असा' बसला कोरोनाचा फटका; 600 कोटींच्या कर्जाची मागणी

आउटसोर्सचे काम अपूर्ण
शहरात बीएसएनलची चिंचवड, वाकड, भोसरी आणि आकुर्डी येथे ग्राहक सेवा केंद्रे आहेत. येथील काम आउटसोर्स करण्यात आले आहे. मात्र, ही यंत्रणा सक्षम नसल्यामुळे कामामध्ये विस्कळितपणा आला असून, त्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी वादाचे प्रसंगदेखील घडत आहेत. 

दोन महिन्यांचा पगार रखडला
जानेवारी ते मार्च या कालावधीत महापालिकेकडून विकासकामे सुरू असतात. रस्त्याची खोदाई करताना अनेकदा बीएसएनएलच्या केबल तुटतात. त्यामुळे फोन बंद पडतात. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा डिसेंबर आणि जानेवारीमधील पगार 
अद्याप झालेला नाही. या महिन्यात पगार मिळेल अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL disrupted due to insufficient staff