खोदाईअभावी "नो कनेक्‍शन' 

सुधीर साबळे
शुक्रवार, 4 मे 2018

लोकसंख्या - सुमारे 22 लाख 
लॅन्डलाइन कनेक्‍शन - 23,807 
ब्रॉडबॅन्ड कनेक्‍शन - 8,422 

मागणी 
लॅन्डलाइन 3000 
ब्रॉडबॅन्ड 4000 

पिंपरी -  तुम्ही जर शहरातील वाकड, रावेत किंवा भोसरीमधील पांजरपोळ परिसरात राहत असाल आणि तुम्हाला भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) लॅन्डलाइन फोनचे नवीन कनेक्‍शन मिळू शकते का, असा प्रश्‍न जर विचारलात तर त्याचे उत्तर नाही असेच असेल. कारण गेल्या तीन वर्षांपासून बीएसएनएलला केबल टाकण्यासाठी आवश्‍यक असणारी नवीन खोदाई करता येत नाही. महापालिकेचा खोदाईचा दर जास्त असल्याचे बीएसएनएलचे म्हणणे आहे. 

बीएसएनएलच्या इंटरनेटसाठी लॅन्डलाइन असणे आवश्‍यक आहे. वाकड, रावेत, हिंजवडी या भागातून लॅन्डलाइन फोनला मोठी मागणी आहे. मात्र, महापालिकेचे खोदाईचे दर जास्त असल्यामुळे बीएसएनलचा विकास अडकून पडला आहे. काही दिवसांपूर्वी बीएसएनएलने महापालिकेकडे टेलिफोन केबलची दुरुस्ती करण्यासाठी शहरातील पाच ठिकाणी खोदाई करण्याची परवानगी मागितली होती. त्यापैकी मासुळकर कॉलनी, पिंपरीमधील कराची चौक आणि शेवाळे कॉम्प्लेक्‍स या ठिकाणी कामाला परवानगी मिळाली. आतापर्यंत 70 टक्‍के काम पूर्ण झाले असून उर्वरित 30 टक्‍के काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. चिखली परिसरात टेलिफोनची जुनी केबल रस्त्याखाली गेली आहे. त्यामुळे नवीन केबल टाकल्यानंतरच कनेक्‍शन देता येणार आहेत. चिखली टेलिफोन एक्‍स्चेंज आणि यशोपुरम या परिसरात 1 हजार 275 मीटर खोदाई करण्यासाठी महापालिकेने 60 लाख रुपये भरण्याची मागणी बीएसएनएलकडे केली. ही रक्‍कम देऊ शकत नसल्यामुळे काम रखडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बीएसएनएलचे लॅन्डलाइन कनेक्‍शन देण्यासाठी येणारा खर्च पाच हजार रुपयांच्या आसपास आहे. नवीन कनेक्‍शन देण्यासाठी रस्त्यावर खोदाई करावी लागते. महापालिकेकडून एका रनिंग मीटरसाठी 12 ते 15 हजार रुपये आकारले जातात. खोदाईचा खर्च परवडणारा नाही. खोदाईचा दर कमी झाला तरच हे शक्‍य होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेला दिला आहे. 
- जे. एन. बुडावी, सरव्यवस्थापक, बीएसएनएल 

आजच्या काळात इंटरनेट ही गरज झाली आहे, त्यामुळे त्याचा विचार करून महापालिकेने बीएसएनएलला खोदाईच्या दरामध्ये सवलत देणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास नागरिकांना लॅन्डलाइन फोनची सुविधा मिळणे सहज शक्‍य होईल. 
- विक्रांत चौधरी, वाकड

Web Title: BSNL no connection in wakad ravet

टॅग्स