
Budget Session 2023 : अंगणवाडी सेविका, मदतनीसांसाठी अर्थसंकल्पात तुटपुंजी वाढ
पुणे : राज्य सरकारच्या गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनामध्ये दिड हजार रुपयांची वाढ करण्यात आली. हि मानधन वाढ अंगणवाडी सेविका व मदतनीसांची केवळ बोळवण करण्याचे काम करण्यात आले असून मुळ वेतनात भरघोस वाढ करा, अशी टिका अंगणवाडी संघटनांकडून करण्यात आली आहे.
मानधन व मुळ वेतनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी पुण्यासह राज्यभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आंदोलन पुकारले होते. सरकारने आश्वासन दिल्यानंतर संघटनांनी त्यांचे आंदोलन स्थगित केले होते. दरम्यान, गुरुवारी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.
त्यामध्ये अंगणवाडी सेविकांचे मानधन 8 हजार 325 रुपयांवरुन 10 हजार केले, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजार 975 वरुन 7 हजार 200 इतके केले. तर मदतनीसांचे मानधन 4 हजार 425 रुपयांवरुन 5 हजार 500 रुपये केल्याची घोषणा केली. त्यानुसार, अंगणवाडी सेविका, मदतीनस यांच्या मानधनामध्ये किमान दिड हजार रुपयांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्रचे अध्यक्ष नितीन पवार म्हणाले, ""अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मुळ वेतन कमी आहे. ते वाढविण्याऐवजी त्यांनी मानधनात केवळ वीस टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदरात केवळ एक ते दिड हजार रुपये पडणार आहेत.
केवळ टक्केवारीची भाषा करुन अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मुळ मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणेमुळे आम्ही समाधानी नक्कीच नाहीत. आता तात्पुरता संप स्थगित केला आहे, मात्र भविष्यात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल.''
"सरकारने आता तरी केवळ घोषणा केली आहे, ते प्रत्यक्षात केव्हा मिळतील हा प्रश्न आहे. आंदोलनाद्वारे आम्ही प्रयत्न केल्याचा किमान काहीतरी फायदा झाला त्याचे समाधान आहे. मात्र मानधन वाढ करताना अनेक अंगणवाडी सेविका, मदतनीस या एकाकी, परित्यक्ता आहेत. याचाही विचार करुन त्यांच्या उत्पन्नाचे अन्य साधन नाही, याचा विचार करायला पाहीजे होता. बससाठी सवलत द्यायला पाहीजे.''
अनिता आवळे, अंगणवाडी सेविका.