फॅशन स्ट्रीट बंद करून व्यावसायिक मार्केट उभारा : विवेक यादव 

fashion street
fashion street

पुणे : सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता लक्षात घेत फॅशन स्ट्रीट मार्केट बंद करून तेथे व्यावसायिक मार्केट उभारण्यात यावे. त्याद्वारे बोर्डाला महसूल मिळेल, असे मत कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विवेक यादव यांनी मांडले. पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल नवनीत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बोर्डाची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्या वेळी यादव बोलत होते. 

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, सदस्य रूपाली बिडकर, प्रियांका श्रीगिरी, डॉ. किरण मंत्री, अतुल गायकवाड, विनोद मथुरावाला, अशोक पवार आदी उपस्थित होते. 
फॅशन स्ट्रीट कँटोन्मेंट परिसरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची होणारी फसवणूक, विक्रेत्यांची अरेरावी, महिलांशी अश्‍लील भाषा वापरून गैरवर्तणूक असे प्रकार घडत असल्याची चर्चा सभेत केली गेली. त्यामुळे फॅशन स्ट्रीटमधील व्यावसायिकांसोबत 1997 मध्ये झालेला तडजोड मसुदा रद्द करण्याचा पवित्रा बोर्डाने घेतला आहे. हा मसुदाच रद्द करून संपूर्ण फॅशन मार्केटच अनधिकृत ठरविण्याच्या हालचाली बोर्डाने सुरू केल्या असून, त्यासाठी कायदेशीर मार्गांची चाचपणी करण्यात येणार आहे. 

या जागेत नवीन व्यावसायिक मार्केट उभारण्याच्या जुन्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव विनोद मथुरावाला यांनी सुचविला. तसेच मार्केटमध्ये सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, कमला मिलसारखी दुर्घटना घडण्याची भीती अतुल गायकवाड यांनी व्यक्त केली. त्यावर सीईओ अमित कुमार यांनी बोर्ड प्रशासन आणि फॅशन स्ट्रीटमधील व्यावसायिकांमध्ये झालेला तडजोड मसुदाच रद्दबातल ठरविण्याची सूचना केली. 

काय आहे मसुदा 
एमजी रोड हॉकर्स अँड पथारी व्यावसायिक असोसिएशन (सेवा संस्था) आणि बोर्ड प्रशासनामध्ये 1997 मध्ये हा तडजोड मसुदा झाला होता. या मसुद्यानुसार, बोर्डाने महात्मा गांधी रस्त्यावरील 448 पथारी व्यावसायिकांना कांबळे मैदानात स्थलांतरित करत फॅशन मार्केट वसविले. बोर्डाने पथारी व्यावसायिकांना चार बाय पाच आकाराचे ओटे दररोज पाच रुपये भाडेकराराने उपलब्ध करून दिले. सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेतच व्यवसाय करण्याची अटही घालून दिली. मात्र व्यावसायिकांकडून या अटी-शर्तींचे पालन होत नसल्याचा दावा बोर्डाकडून केला जात आहे. 

''बोर्डाने अनधिकृत व्यावसायिकांवर जरूर कारवाई करावी, परंतु मूळ तडजोड मसुद्याच्या विरोधात गेल्यास नाइलाजास्तव बोर्डाविरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल.'' 
-अॅड. म. वि. अकोलकर, अध्यक्ष, एमजी रोड हॉकर्स अँड पथारी व्यावसायिक असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com