येवलेवाडी आराखड्यात बिल्डरांचे हित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पुणे - येवलेवाडीच्या विकास आराखड्यात अनेक आरक्षणांचे निवासीकरण केले आहे. हा आराखडा बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचा असून, स्थानिक नागरिक, शेतकरी यांच्यावर अन्यायकारक असल्याचा आरोप मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी केला. त्याच वेळी त्यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्यावर आरोप केले. आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा टिळेकर यांनी केला आहे.

पुणे - येवलेवाडीच्या विकास आराखड्यात अनेक आरक्षणांचे निवासीकरण केले आहे. हा आराखडा बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचा असून, स्थानिक नागरिक, शेतकरी यांच्यावर अन्यायकारक असल्याचा आरोप मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी केला. त्याच वेळी त्यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्यावर आरोप केले. आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा टिळेकर यांनी केला आहे.

येवलेवाडीचा विकास आराखडा मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. गेल्या महिनाभरात मोरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आराखड्यातील त्रुटींकडे लक्ष वेधत होते. सोमवारी त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. हा विकास आराखडा पारदर्शी असला पाहिजे. यात कोणी आरक्षणे बदलली, नियोजन समितीने काय केले, हे स्पष्ट होण्यासाठी सीबीआय चौकशी करा, संबंधितांचे ब्रेन मॅपिंग करा, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. बांधकाम व्यावसायिकांचे हित डोळ्यांसमोर ठेवून आराखड्यातील आरक्षणात बदल केले आहेत. सर्व्हे क्रमांक ३९, ४० आणि ४१ येथील तीव्र उताराचे आणि खाणी असलेल्या भागाचे निवासीकरण केले आहे. दगडाचा भाग असलेल्या ठिकाणी दफनभूमीचे आरक्षण टाकून ते पुन्हा काढण्यात आले. या जागेच्या शेजारी ५७२ गुंठे जागा निवासी केले गेली. या जागेजवळ वन विभागाच्या जागेतून रस्त्याचे आरक्षण टाकले गेले, लष्कराच्या मालकीच्या जागेकडे जाण्यासाठी रस्ताच दाखविला नाही, बोपदेव घाटाजवळ एका उद्यानाचे आरक्षण बांधकाम व्यावसायिकासाठी बदलले गेले. ते बांधकाम व्यावसायिकाच्या जागेच्या शेवटच्या बाजूला टाकले आहे, असे विविध गैरप्रकार असून, यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

टिळेकर यांना आलिशान गाडी भेट 
येवलेवाडीतील विकास आराखड्यात एका बांधकाम व्यावसायिकाशी संबंधित जागा निवासी केल्याने त्याने आमदार टिळेकर यांना आलिशान गाडी भेट दिल्याचा आरोप मोरे यांनी केला. टिळेकर वापरत असलेल्या त्या आलिशान गाडीची कागदपत्रे, त्यासाठी कर्जफेडीसंदर्भातील नोंदी पत्रकारांना दिल्या. याबाबत टिळेकर यांनी ही आलिशान गाडी माझ्या मित्राची असून, ती वापरणे चूक नाही. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असे नमूद केले.

Web Title: Builders interest in the Yeolewadi