नकाशाप्रमाणेच हवे इमारतीचे बांधकाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

समाविष्ट गावांत धोकादायक बांधकामे 
महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांत गेल्या एक-दीड वर्षात प्रचंड बेकायदा बांधकामे झाल्याचे दिसून येत आहे. परवानगी, त्याचा शुल्क चुकविण्यासाठी गावकऱ्यांनी घाईगडबडीत कामे केली आहेत. त्यातील बहुतांशी बांधकामे कच्च्या स्वरूपाची आहेत. त्यामुळे ही बांधकामे धोकादायक असल्याचे उघड आहे.

पुणे - महापालिका प्रशासनाला गाफील ठेवून बांधकामाच्या रचनेकडे दुर्लक्ष करीत इमारतींचे मजले वाढविले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. परिणामी, रहिवाशांच्या दृष्टीने जीवघेण्या ठरणाऱ्या इमारतींचा शोध घेऊन, त्यांच्यावर कारवाई करतानाच बांधकाम व्यावसायिकांविरोधातही कठोर पावले उचलली जाणार आहेत. त्यासाठी शहर आणि उपनगरांमधील बांधकामांची पाहणी करण्यात येणार आहे.

जुन्या बांधकामांसह नव्या बांधकामांचे नकाशे, रचना आणि बांधकामे तपासण्याचा आदेश या खात्यातील अभियंत्यांना देण्यात येणार आहे. प्रामुख्याने, कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव, वारजे, उरुळी देवाची, फुरसुंगीलगतची बांधकामे तपासली जातील, असे महापालिकेतून सांगण्यात आले. 

कोंढवा (खु.) येथील पाच मजली इमारतीच्या पायावरील खांब खचल्याने इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हाच ही इमारत बेकायदा असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर कारवाईसाठी चालढकल केलेल्या महापालिकेने रहिवाशांना हलवून इमारत पाडली. मुळात, या इमारतीचे बांधकाम होऊन अनेक वर्षे झाली तरी, ती बेकायदा असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कल्पना नव्हती का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला. त्यामुळे बांधकाम खात्याच्या कारभारावर टीका झाली. 

सध्या उपनगरांत मोठ-मोठ्या इमारती उभारण्यात येत असून, त्यात बेकायदा बांधकामांची संख्या आधिक आहे; परंतु कारवाईच्या भीतीपोटी बांधकामे आटोपण्याकडे संबंधितांचे लक्ष असते. त्यात, बांधकामच्या उभारणीत त्रुटी राहातात. त्यामुळे अशा इमारती रहिवाशांच्या दृष्टीने असुक्षितत असतात. यापूर्वी वाघोली, तळजाई परिसरात अपघात घडून कामगारांना जीव गमवावा लागला. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून नकाशे आणि प्रत्यक्ष काम यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात येते; परंतु, नकाशाप्रमाणेही बांधकामे होत नाहीत, अशी तक्रारी आल्याने इमारतींची पाहणी केली जाईल. तसे आढळून आल्यास बांधकाम थांबवून जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल.
- युवराज देशमुख, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका

Web Title: Building Construction Map Municipal Illegal Construction Crime