बुखारींची हत्या ही भविष्यातील धोक्‍यांची नांदी : संजय नहार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

भारत आणि पाकिस्तानमध्ये येत्या काळात निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काश्‍मीरचा वापर केला जाऊ शकतो. यापूर्वी देखील दोन्ही देशांनी या राज्याचा राजकीयदृष्ट्या वापर केलेला आहे. त्यात तेथील सामान्य माणूस होरपाळला जातो. हे कुठे तरी बदलले तर तेथील चित्र बदलू शकेल. 
- संजय नहार (संस्थापक, सरहद) 

पुणे : काश्‍मीरमधील तरुणांचा अतिरेक्‍यांना पाठिंबा मिळू लागला आहे. शत्रू राष्ट्रांना जे हवे आहे, तेच तिथे घडत आहे. पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या ही केवळ घटना नाही, तर ती पुढे घडणाऱ्या धोक्‍याची घंटा आहे. त्यानुसार केंद्र सरकारने धोरणे बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन "सरहद'चे संस्थापक संजय नहार यांनी केले. 

जम्मू काश्‍मीरमधील रायझिंग काश्‍मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर नहार यांनी "सकाळ फेसबुक लाइव्ह'साठी मुलाखत दिली. तरुणांची मानसिकता, भारत आणि पाकिस्तानमधील आगामी निवडणुका तसेच तेथील परिस्थिती हाताळण्यासंबंधीच्या धोरणांवर त्यांनी भाष्य केले. तेथे शस्त्रसंधी वा लष्करी कारवाया थांबवून प्रश्‍न सुटणार नाही, तर तेथील तरुणांना साद घालावी लागेल, असे त्यांनी सांगितले. 

बुखारी यांच्याबद्दल ते म्हणाले, ""काश्‍मीरमध्ये शांतता नांदावी, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. त्यांची भूमिक समन्वयाची आणि वाटाघाटी करून प्रश्‍न सोडवायची होती. परंतु, इतिहासात डोकावले, तर अशी भूमिका घेणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागली आहे. काश्‍मीरविषयी ज्यांनी वाटाघाटीच्या मार्गाचा आग्रह धरला, त्यांची हत्या झालेली आहे. बुखारीदेखील याच विचाराचे होते, त्यांनादेखील जीव गमवावा लागला.'' 

केंद्र सरकारने काश्‍मीरसाठी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. याची खदखद तेथील युवकांच्या मनात आहे. पूर्वी या तरुणांना पाकिस्तानकडून शस्त्रे, पैसा पुरविला जायचा. परंतु त्याचे प्रमाण आता अल्प झाल्याने दहशतवादी विचार घेऊन एकत्र येणारे स्थानिक तरुणांचे जथ्थे तयार होऊ लागले आहेत. पाकिस्तानला हवी तशीच स्थिती आता तिथे निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे शस्त्रसंधी वा लष्करी कारवाया थांबवून कोणताही फरक पडणार नाही. त्यासाठी राजकीय धोरणांमध्ये तातडीने बदल करावा लागेल, असे नहार यांनी सांगितले. 
 

काश्‍मीरमधील अशांततेवर संजय नहार यांच्याशी संवाद पाहा सकाळच्या फेसबुक पेजवर 

Web Title: Bukharis murder is the key to future threats says Sanjay Nahar