एकगठ्ठा मतदानामुळेच भाजपला अनपेक्षित यश

प्रसाद पाठक - @pprasad_sakal
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

सोसायट्या आणि झोपडपट्टीबहुल पर्वती आणि नवी पेठेत यंदा कमळ फुलले खरे ! पण हे घडले ते मतदारांनी परंपरेला छेद दिल्यानेच. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार फारसे चालले नाहीत अन्‌ शिवसेना, मनसेला स्वतःची ताकदच दाखविता आली नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने कमळाला साथ दिली. पण कमळ चिन्हच महत्त्वाचे ठरले अन्‌ मतदारांनी एकगठ्ठा मतदान केल्याने भाजपला अनपेक्षित यश मिळाले. 

सोसायट्या आणि झोपडपट्टीबहुल पर्वती आणि नवी पेठेत यंदा कमळ फुलले खरे ! पण हे घडले ते मतदारांनी परंपरेला छेद दिल्यानेच. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार फारसे चालले नाहीत अन्‌ शिवसेना, मनसेला स्वतःची ताकदच दाखविता आली नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने कमळाला साथ दिली. पण कमळ चिन्हच महत्त्वाचे ठरले अन्‌ मतदारांनी एकगठ्ठा मतदान केल्याने भाजपला अनपेक्षित यश मिळाले. 

नवी पेठ-पर्वती (प्रभाग क्रमांक २९) हा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारसरणीला पसंती दर्शविणारा. तर झोपडपट्टीतील मतदार आरपीआयच्या जवळचा. पण भाजपने आरपीआयसोबत युती केल्याने, मतदारही कमळावर प्रभावित झाले. साहजिकच येथील मतदारांनीही कमळाला साथ दिली. कमळ चिन्ह मिळालेल्या भाजपच्या माजी नगरसेविका सरस्वती शेंडगे आणि भाजप पुरस्कृत आरपीआयच्या सत्त्यभामा साठे यांच्यामध्ये मतदार कोणाला झुकते माप देणार ही उत्सुकता होतीच. परंतु कमळाची हवा असल्यामुळे शेंडगे विजयी झाल्या. करवत चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या साठे यांच्या झोळीत केवळ ६८६ मते पडली.  

भाजपने उमेदवारी नाकारल्याने माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळविले. स्वतः माघार घेऊन पत्नी जयश्रीला निवडणुकीत उभे करून स्वतःचीच प्रतिष्ठा पणाला लावली. परंतु पक्षबदलाचा फटका बसल्याने जयश्री यांना पराभव स्वीकारावा लागला. तर राष्ट्रवादीच्या रिना शिंदे आणि काँग्रेसच्या माधुरी पाटोळे मतदारांवर आपली छाप पाडू शकल्या नाहीत. 

युती तुटल्याने शिवसेनेचे अशोक हरणावळ यांच्यापुढे भाजपने महेश लडकत यांना उभे करून यशस्वी आव्हान निर्माण केले. राष्ट्रवादीकडून विनायक हनमघर आणि काँग्रेसकडून किरण गायकवाड यांनी जोर लावण्याचा केलेला प्रयत्न फसला. तर मनसेचे अभिमन्यू मैड यांनी दिलेली लढत एकतर्फीच ठरली.

भाजपच्या विद्यमान नगरसेविका स्मिता वस्ते यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार नव्हते. त्यामुळे वस्ते यांना सहज विजय मिळाला. भाजपने विकासासाठी परिवर्तन असा नारा दिला होता. परंतु झोपडपट्टीतील नागरिकांनी फक्त कमळावरच शिक्का मारायचा, याच एकमेव अजेंड्यावर पॅनेल पद्धतीने मतदान केले. शिवसेनेच्या प्रज्ञा काकडे, राष्ट्रवादीच्या योगिता मेमाणे, मनसेच्या उषा काळे आणि काँग्रेस पुरस्कृत शारदा गावडे आदींनी घरोघरी केलेला प्रचार विजयासाठी पुरेसा ठरला नाही.  

भाजपचे प्रदेश सदस्य धीरज घाटे यांचा हा स्थानिक मतदारसंघ. घाटे यांची भावजय विद्यमान नगरसेविका मनीषा घाटे या देखील याच मतदार संघातल्या. धीरज यांच्यासमोर काँग्रेसने विकास लांडगेंना उभे केले. परंतु काँग्रेसचे बंडखोर सुधीर काळे यांनीच लांडगे यांची मते खाल्ली.

राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक श्‍याम मानकर उभे होते. पण नागरिकांची मते आपल्याकडे वळविण्यात ते अपयशीच ठरले. पर्यावरण क्षेत्रात ठसा उमटवलेल्या डॉ. सचिन पुणेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली, तर मनसेने अक्षता लांडगे यांना दिली. या दोन्ही उमेदवारांना मतदारांपर्यंत पोचण्यास फारसा वेळ मिळाला नाही. त्याचा फायदा घाटे यांना झाला. मात्र सोसायट्यांतील सुशिक्षित मतदारांनी मोठ्या संख्येने ‘नोटा’चा (नन ऑफ द अबोव्ह) वापर केला. त्याचाही विचार वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आगामी काळात करावाच लागेल.

Web Title: bulk voting BJP unexpected success