त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नाय
सुपे - एकच बैल होता. चितऱ्या त्याचं नाव. शेजारच्या बैलाच्या वारंगुळ्यावर शेती करायचो. चारा-पाण्याअभावी दावणीला मरण्यापरीस चितऱ्याला व्यापाऱ्याला इकला. त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नाय. डोळ्याच्या कडा पुसत पानसरेवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी लव्हाजी दादासाहेब काळखैरे सांगत होते. त्यांची ही प्रतिक्रिया एकूणच परिसरातील दुष्काळाची दाहकता सांगणारी आहे.

पानसरेवाडीच्या बोबडेमळ्यात लव्हाजींची तीन एकर शेती आहे. दुष्काळामुळे विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याअभावी शेती नापीक आहे. फळबागा कशा जगवायच्या हा गंभीर प्रश्न आहे. जिरायती भाग असल्याने शेतीमाल उत्पादनाची शाश्वती नसल्याने शेतीपूरक दुधाच्या व्यवसायावर कुटुंबाची गुजराण चालते. अगदी मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे विवाह दूध व्यवसायावर अवलंबून असतात.
लव्हाजी काळखैरे म्हणाले, ‘‘दावणीला किमान २ ते कमाल ८-१० जनावरे असायची. गेल्या दोन महिन्यांपासून ही संख्या निम्म्याने घटली आहे. त्यातच दुधाचे अनुदान मिळत नसल्याने परवडत नाही. त्यांचा किमान रोजचा खुराक आणि वाढ्याचे पैसेसुद्धा वसूल होत नाहीत. शेतीला विकतची खते घालून परवडत नसल्याने त्यांचे शेण हाच सध्या नफा म्हणायचा.’
दुधाचे दर वाढण्याऐवजी कमी
अनेक शेतकऱ्यांनी होती तेवढी जनावरे विकल्याने गोठे ओस पडले आहेत. घरचे दूध असावे म्हणून काहींनी एखाद दुसरे जनावर ठेवले आहे. त्यांना विकतचा चारा घालून जगवावे लागत आहे. महागाईमुळे प्रत्येक वस्तूची किंमत वाढत आहे. याला अपवाद आहे दूध. २०१३-१४ मध्ये असलेले दुधाचे दर वाढण्याऐवजी कमी झाले आहेत, अशी खंत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सध्या दुधाला, कांद्याला बाजार मिळत नाही. शेतीत काहीच परवडत नसल्याने, जेजुरीच्या एका कंपनीत आम्ही दोघे रोजंदारीवर कामाला जात आहोत. जिरायती भागातील कांद्यासारख्या नगदी पिकाला हमीभाव नाही. दुधाला अनुदान नसल्याने दूधधंदा तोट्यात आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्याची गरज आहे. दुष्काळामुळे वीजबिल, शेतीकर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
- उत्तम काळखैरे, शेतकरी