नागापूरमध्ये बैलगाडे रोखण्यासाठी कडक बंदोबस्त

मंगळवार, 22 जानेवारी 2019

निरगुडसर - नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थानच्या यात्रेत कुणी बैलगाडे पळवू नये, तसेच काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे येथून आलेला दंगा कंट्रोल पथकाच्या (आरसीएफ) २२ जवानांसह एकूण ५० पोलिस घाटासह विविध ठिकाणी सोमवारी तैनात करण्यात आले आहेत. रस्त्याला पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

नागापूर येथे श्री क्षेत्र थापलिंग येथील गडावर खंडोबा देवाची यात्रा उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. येथील यात्रेला नवसाचे बैलगाडे पळविले जातात. परंतु, गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला बंदी घातली आहे. परंतु, शनिवारी (ता. १९) थापलिंगच्या घाटात काही बैलगाडा मालक गाडे पळविणार असल्याची माहिती मंचर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घाटात जेसीबीच्या सहाय्याने खड्डे घेतले आहेत. 

यात्रेत बैलगाडा पळवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये, यासाठी सोमवारी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा कंट्रोल पथकाचे २२ जवान, ५ पोलिस अधिकारी व मंचर, नारायणगाव, खेड, जुन्नर, घोडेगाव आळेफाटा येथील पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, असे एकूण ५० पोलिस यात्रेप्रसंगी तैनात करण्यात आले आहेत. 
यात्रेकडे जाणाऱ्या जवळे फाटा, नागापूर फाटा, वळती फाटा, भराडी फाटा अशा सर्व रस्त्यांवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहनात बैलगाडा 
आहे का, याबाबत वाहनांची तपासणी करत आहे.