कोंडवाडा 'हाउसफुल्ल'

cow on road.jpg
cow on road.jpg

पुणे : तुम्ही शहरासह उपनगरातल्या कुठल्याही रस्त्यावर जा. तिथे तुम्हाला मोकाट जनावरांचे दशर्न झाले नाही, तरच नवल!...अरेरे नुसते दर्शनच नव्हे, तर ही जनावरे हमखास तुमचा 'रास्ता रोको'ही करतील.अगोदरच वाहतूक कोंडीची डोकेदुखी आणि त्यात ही भर.मोकाट जनावरांसाठी महापालिकेकडे इनमिन एकच कोंडवाडा आहे. त्यात केवळ ५० ते ६० जनावरे राहू शकतात.कोथरूडमध्ये असलेला हा एकमेव कोंडवाडा कायमच हाउसफुल्ल असल्याने बाकीच्या शेकडो जनावरांचे बस्तान हे रस्त्यावरच असते. त्यामुळे या जनावरांचे करायचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. 
स्वामी विवेकानंद मार्ग, सातारा रस्ता, पंडित नेहरू रस्ता, बिबवेवाडी कोंढवा रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे बसलेली असतात. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. शहराचे नागरीकरण पाहता कित्येक गावे शहरामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
महापालिकेने शहरातील सर्व गोठाधारकांना मुंढवा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या दुग्ध व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे. मात्र शहरातील जनावरांच्या तुलनेत ही जागा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. 
महापालिका प्रशासनाकडे शहरातील मोकाट जनावरांना ठेवण्यासाठी कोथरूड येथील कचरा डेपो लगत एकर जागेत कोंडवाडा आहे. त्यामध्ये केवळ पन्नास ते साठ जनावरे एकावेळेस राहू शकतात. त्यासाठी महापालिकेची केवळ दोनच वाहने असून, एकावेळी केवळ एका वाहनातून चार ते पाच जनावरांवरांची वाहतूक करता येते.
रस्त्यांवरील मोकाट जनावरे पाहता हजारोंच्या संख्येमध्ये मोकाट जनावरे आहेत; परंतु कोंडवाड्यात केवळ पन्नास ते साठ जनावरे ठेवण्याची क्षमता आहे, त्यामुळे मोकाट जनावरांवर कारवाई करून त्यांना ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था महापालिकेकडे नाही. त्यामुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चाललेला आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर शेकडो मोकाट जनावरे फिरत असून, त्यामुळे अनेक अपघात व वाहतूक कोंडी होत आहे. 
महापालिका प्रशासन दर पंधरा ते वीस दिवसांनी मोकाट जनावरांचा लिलाव करत असते. 
कोंडवाड्यामध्ये जमा असलेल्या जनावरांचे मालक जनावरे घेण्यासाठी आले नाही तर महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये ठरलेल्या ठरावानुसार जनावरांसाठी एका खासगी संस्थेशी करार केलेला असून, ठरवलेल्या दरानुसार जनावरे खासगी संस्थेकडे पालन पोषणासाठी दिली जातात. त्यामुळे काही प्रमाणात मोकाट जनावरांचा प्रश्‍न मार्गी लागतो. परंतु मोकाट जनावरांची संख्या पाहता सर्व उपाययोजना कमी पडत असल्याचे जाणवते.
प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याचे धोरण राबविण्याची गरज असल्याचे दिसून येते. 

'खुंटीला बांधून ठेवलेल्या जनावरांवर कारवाई करता येत नाही; परंतु मोकाट जनावरांवर कारवाई करता येते. मुंढवा येथे शहरातील स्थायिक गोठ्यांसाठी जागा उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे उपनगरांमधील जनावरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवरील गोठा व्यावसायिकांची मदत लागणार असून, समन्वयातून लवकरच मोकाट जनावरांचा प्रश्‍न सुटेल. '
- बाळासाहेब साबळे, मंडई अधिकारी, मनपा 

'मोकाट जनावरांसाठी जागा कमी पडत असून, वेळोवेळी प्रशासनाच्या आदेशानुसार जनावरांवर कारवाई सुरू आहे, जागा वाढवून मिळण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे.' 
- एस. हनमगर, कोंडवाडा विभाग अधिकारी 

'उपनगरांचा विकास होताना प्रशासनाने पारंपरिक दुग्ध व्यावसायिकांसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. केलेल्या उपाययोजनांमध्ये कागदोपत्री व्यावसायिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने जनावरांच्या गोठ्याबाबत कागदपत्रांची अट शिथिल करून जागेबाबत योग्य निर्णय घेतला पाहिजे. '
- शिवाजी बिबवे, गोठाधारक 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com