धक्कादायक, चोरी करता न आल्यामुळे लावली बंगल्याला आग 

thief
thief

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील माळवाडी नंबर 2 येथील राजेंद्र राऊत यांच्या बंगल्यात चोरी करता न आल्याने चोरट्याने थेट बंगल्याला आग लावली. त्यामुळे त्यांचे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. दैव बलवत्तर असल्याने राऊत कुटुंब या आगापासून बचावले. 

माळवाडी नंबर 2 (ता. इंदापूर) येथे चोरट्याने रविवारी (ता. 10) मध्यरात्री 1 ते 3 या कालावधीत अशोक निगडे यांच्या घरातील तीन तोळे सोनं लंपास केले; तर राजेंद्र राऊत यांच्या बंगल्याला चोरी करता न आल्याने आग लावली. त्यामुळे त्यांचे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, दैव बलवत्तर असल्याने राऊत कुटुंब बचावले. 
इंदापूरच्या माळवाडी नंबर दोन येथील निगडे यांच्या घराच्या खिडकीची कडी काढून चोरट्याने 3 तोळे सोने व पॅंटच्या खिशातील पाकीट चोरून नेले. या पाकिटात रोख 3 हजार रुपये, पॅन कार्ड, आधारकार्ड व भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम कार्ड होते. 

दरम्यान, निगडे यांच्या घरातील चोरीनंतर चोरट्याने राजेंद्र तुकाराम राऊत यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवला. मात्र, परिसरातील नागरिकांना चाहूल लागल्याने चोरटा पळून गेला. मात्र, अर्ध्या तासानंतर त्याने पुन्हा राऊत यांच्या बंगल्यात प्रवेश केला. मात्र, त्याला लोखंडी ग्रील दरवाजासमोर असल्याने दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे त्याने दरवाजाशेजारील खिडकीचे गज कटावणीने कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्‍य न झाल्याने त्याने खिडकीवरील आतील कापडी पडदा पेटवून दिला. त्यामुळे संपूर्ण हॉलमधील फर्निचर आणि हॉल व शेजारील खोल्यांतील 4 पंखे, टीव्ही, फ्रिज, 3 मोबाईल, एसी, पीओपी, वीज वायरिंग खाक झाले. सुदैवाने स्वयंपाकघरातील सिलिंडर टाकीचा आगीमुळे स्फोट न झाल्याने मोठा अनर्थ टळला. 

या आगीवेळी राऊत हे पत्नी व पाच महिन्याच्या मुलासह बंगल्याच्या शयनकक्षात होते. त्यांनी प्रसंगावधान राखून बंगल्याच्या टेरेसवर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतल्याने ते बचावले. त्यांनी भ्रमणध्वनीवरून शेजाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर गणेश भोंग, राजू गार्डे, महादेव व्यवहारे, दत्तात्रेय ढावरे, बाळासाहेब लोणकर, बाबूराव भोंग आणि इंदापूर नगरपरिषद अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझविण्यात आली. 

दरम्यान, पोलीस निरीक्षक मधुकर पवार, इंदापूर नगरपरिषद विरोधी गटनेते पोपट शिंदे यांनी वीज मंडळ अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी सकाळी राऊत यांच्या बंगल्याची पाहणी केली. हा प्रकार शॉर्टसर्किटमुळे झाला नसल्याचे वीज मंडळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 
याबाबतचा पुढील तपास गणेश लोकरे करत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com