बंगल्यावर उभारला शिवरायांचा पुतळा

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मंचर - आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या बंगल्यात तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. 

मंचर - आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या बंगल्यात तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. 

बांगर आठ वर्षांपासून शिवचरित्र व शंभूराजे यांचे चरित्र सांगण्याचे काम करतात. नाट्य रूपाने हुबेहूब प्रसंग सांगण्याची त्यांची खासियत आहे. संगीताची साथ देणारे मुस्लिम समाजाचे युवक आहेत. बंगल्याच्या प्रवेश द्वारावर दोन मावळे, इमारतीवर शिवमुद्रा व पहिल्या मजल्यावर शिवचरित्र अभ्यासकासाठी ग्रंथालय सुरू केले आहे. अभ्यासिका  शिवप्रेमींसाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत खुली ठेवली आहे. बाजीराव महाराज म्हणाले, ‘‘शिवाजी महाराज यांना थेट घरात आणण्याचे व दररोज त्यांची पूजा करण्याचे स्वप्न होते.

बंगल्याचे काम सुरू केले. मंचर येथील शिल्पकार गणेश पांचाळ व  वसंत परदेशी यांच्याबरोबर चर्चा केली. कोणत्या गावात पुतळा बसविणार असे त्यांनी मला विचारले. मी सांगितले, माझ्या बंगल्यावर महाराजांचा पुतळा बसवायचा आहे. त्या वेळी त्यांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यांनी होकार देऊन उभा पुतळा तयार करण्याचे काम सुरू केले. पंधरा दिवसांत पुतळा तयार झाला.’’ पुतळा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. शिवभक्त गोरक्षक पंडित मोडक, वैभव पोखरकर, अनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत महाराजांच्या पुतळ्याचा नुकताच अनावरण समारंभ झाला आहे.

Web Title: bunglow shivaji maharaj statue bajirao bangar