मुलांच्या लठ्ठपणात प्रदूषणाचाही ‘भार’

मुलांच्या लठ्ठपणात प्रदूषणाचाही ‘भार’

पुणे - वर्गातील चाळीसपैकी पंधरा मुले लठ्ठ असतात, असे धक्कादायक निरीक्षण वेगवेगळ्या शाळांतील शिक्षकांनी ठळकपणे नोंदविले आहे. शहरामधील धोकादायक पातळीवर पोचलेले प्रदूषण, जंक फूडची वाढती संस्कृती आणि भाजीपाल्यांवर मोठ्या प्रमाणात फवारली जाणारी कीटकनाशके या सर्वांचा थेट परिणाम म्हणून शाळकरी मुलांमधील लठ्ठपणा वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

पर्यावरणात झालेल्या प्रत्येक बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो. शहरातील वाढलेल्या प्रदूषणाचा लहान मुलांच्या आरोग्यावर झालेल्या नेमक्‍या परिणामांची माहिती मंगळवारी (ता. ५) असलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘सकाळ’ने घेतली. 

शहरात गेल्या पंधरा वर्षांत प्रदूषणाची पातळी वेगाने वाढली आहे. पूर्वी मध्यवस्तीपुरते मर्यादित असलेले प्रदूषण आता सिंहगड रस्ता, वाघोली, कोथरूड, बाणेर, कात्रज या उपनगरांतही वेगाने वाढले आहे. त्याचा नेमका काय दुष्परिणाम शाळकरी मुलांवर झाला, याची माहिती वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षकांकडून घेण्यात आली. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.

पर्यावरण आणि लठ्ठपणा
वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुराचा दुष्परिणाम फुफ्फुसाबरोबरच चयापचयाच्या क्रियेवर होतो.  त्यातून चयापचयाची क्रिया बदलते. हायड्रोकार्बनसारख्या घटकातून स्थूलता वाढते. शहरांत या प्रदूषकाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे शहरांमधील शाळांमधे लठ्ठ मुलांची संख्या वाढत असल्याचे दिसते. देशात शहरीकरणाचा सर्वाधिक वेग महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने लहान मुलांमधील लठ्ठपणा ही धोक्‍याची घंटा आहे, असे बेरियाट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी सांगितले. 

..असा होतो दुष्परिणाम
अर्भक ते शाळकरी मुले यांच्या शरीरातील अवयवांची वाढ होत असते. नेमके याच वयाच स्पर्धा, वेगवेगळे क्‍लासेस यात मुलांना अडकवले जाते. त्याच्या जोडीला जंक फूड असते. त्यामुळे दुसरी, तिसरीच्या मुलांमध्ये ॲसिडिटी वाढलेली दिसते. ती मुले लठ्ठपणाकडे झुकलेली असतात. फळभाज्यांवर फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकांचाही लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

जीवनाची गुणवत्ता जपण्यासाठी पर्यावरणाशी सुदृढ नाते संबंध जपणे आवश्‍यक आहे. शुद्ध हवा, पाणी आणि अन्न हे घटक निसर्गातून आपल्याला मिळतात. त्यामुळे खऱ्या जंगलाची नाळ तोडता कामा नये.’’
- डॉ. सतीश पांडे, पर्यावरण अभ्यासक

दहा वर्षांपूर्वी शाळेतील चाळीसपैकी पाच ते सहा मुले लठ्ठ असायची. आता हे प्रमाण पंधरापर्यंत वाढले आहे. त्यासाठी मुलांच्या खाण्याच्या बदललेल्या सवयींकडे विशेषतः लक्ष द्यावे लागते आहे.’’ 
- रेवन पवार, मुख्याध्यापक,  नव महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय, धनकवडी  

स्थूलपणा टाळण्यासाठी 
 चौरस आहार
 नियमित व्यायाम
 मैदानी खेळ खेळणे
 आहारात सेंद्रिय पालेभाज्या घ्याव्यात
 शहरातून फिरताना नाक आणि तोंडावर रुमाल बांधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com