संकटात सनदी अधिकारी समाजासोबत- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

'एका' मुलीचे 'दुःख'
मुलगी असणे आणि तीसुद्धा 'एकुलती एक' असणे याचा वेगळाच आनंद असतो, असे मत श्‍याम देशपांडे यांनी व्यक्त केले. त्यानंतर शरद पवार यांनी खास त्यांच्या शैलीत 'एकुलत्या एक' मुलीचे 'दुःख' सांगितले. सभागृहामध्ये पहिल्याच रांगेत बसलेल्या सुप्रिया सुळे यांच्याकडे बघत 'काल रात्री साडेअकरा वाजता मुलीचा फोन आला आणि 'अजून झोपला नाही का' असे तिने दरडावून विचारले. त्यातही वडील आणि मुलगी दोघे सार्वजनिक जीवनात सक्रिय असल्यावर तर बापाला मार्गदर्शन करण्याची संधीही मुलगी सोडत नाही,'' अशी 'तक्रार' पवार यांनी केली.

पुणे : "राजकारण्यांपैकी माझा प्रशासनाशी सर्वाधिक संबंध आला आहे. एकूण 27 वर्षे मी प्रशासकाचे काम केले आहे. राज्यातील सनदी अधिकारी हे संकटाच्या वेळी समाजासोबत उभे राहतात, हा माझा अनुभव आहे. चांगला प्रशासक होण्यासाठी यंत्रणेला विश्‍वास द्यावा लागतो,'' असे मत ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

'प्रशासन कृतज्ञता गौरव समिती'तर्फे आयोजित कार्यक्रमात निवृत्त सनदी अधिकारी श्‍याम देशपांडेलिखित 'सद्‌सद्विवेक' या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंके, श्रीपाल सबनीस, समाजवादी नेते भाई वैद्य आदी उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, "घटनेशी बांधिलकी असलेली सामाजिक बांधिलकी मी कायम जपली आहे.''
वैद्य म्हणाले, "सध्याच्या काळात समाजातील सर्व दोष प्रशासनामध्ये आले आहेत. प्रशासनाची जबाबदारी वाढते आहे. सत्ताधाऱ्यांनी घटनाविरोधी कृत्य केले, तर प्रशासन काय करेल. त्यांच्याविरोधात बोलेल किंवा नाही? याची मला चिंता वाटते. त्यामुळेच प्रशासनामध्ये जबाबदार आणि ज्ञानी व्यक्तींची गरज आहे.'' साळुंके, सबनीस यांनी मनोगत व्यक्त केले.

'फडणवीस' यांचे सूत्रसंचालन
'कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांगल्या पद्धतीने केले आहे; पण मला त्यांचे नाव माहिती नाही'', असे म्हणत शरद पवार यांनी सूत्रसंचालिकेला नाव विचारले. त्यावर 'फडणवीस' असे उत्तर आल्यावर सभागृहात हशा पिकला. पवार यांनाही हसू आवरेनासे झाले. 'आजकाल काही प्रतिष्ठित आणि प्रोफेशनल सूत्रसंचालक वक्‍त्यांची अशी ओळख करून देतात जी खुद्द वक्‍त्यांनाही माहिती नसते. दोन-तीन वक्‍तेअसतील तर आधी ओळख आणि नंतर वक्‍त्याच्या भाषणाचा सार सांगत बसतात. स्वतःच वक्‍त्याच्या भूमिकेत जाणाऱ्या अशा सूत्रसंचालकांचा वेगळा कार्यक्रम ठेवत जा, असे आयोजकांना सांगावे लागते,'' असा अनुभव सांगत पवार यांनी पुन्हा सूत्रसंचालिका शुभदा फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीस या नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाशी संबंधित आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी 'फडणवीस' यांनी नागपूरला निरोप कळविते, असे 'आश्‍वासन'ही पवार यांना दिले.
 

Web Title: bureaucrats stand by society in difficult times, says sharad pawar