शस्त्रक्रियेसाठी ठेवलेले पैसे खाक (व्हिडिओ)

नितीन बिबवे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मला पायाच्या दुखण्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्याने गेल्या काही महिन्यांपासून पैसे साठवत होते. मात्र, कालच्या अग्नितांडवात जमविलेल्या ३५ हजार रुपयांची माझ्या डोळ्यांसमोर राखरांगोळी झाली. आता मी काय करू, अशी कैफियत मांडताना ताराबाई लंगर यांना अश्रू अनावर झाले.

पुणे - मला पायाच्या दुखण्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्याने गेल्या काही महिन्यांपासून पैसे साठवत होते. मात्र, कालच्या अग्नितांडवात जमविलेल्या ३५ हजार रुपयांची माझ्या डोळ्यांसमोर राखरांगोळी झाली. आता मी काय करू, अशी कैफियत मांडताना ताराबाई लंगर यांना अश्रू अनावर झाले.

पायाच्या दुखण्यामुळे घरात झोपून होते, शेजारील गोदामात आग लागली, लोकांचा आरडाओरडा सुरू होता, कोणालाही माहीत नव्हते मी घरात झोपलेली आहे. तेवढ्यात माझा मुलगा आला आणि त्याने मला घरातून बाहेर आणले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले, असेही त्या म्हणाल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

अप्पर शिवरायनगरमधील गल्ली (क्र. २२) मध्ये रविवारी (ता. १) केटरिंगचा व्यवसाय असणाऱ्या गोदामास लागलेल्या आगीत आसपासच्या अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. ताराबाई या धुण्याभांड्यांची कामे करतात; तर पती भीमराव हे बिगारी काम करतात. त्यांचा मुलगा दूध टाकण्याचे काम करतो. ताराबाई या गेल्या काही दिवसांपासून उजव्या पायाच्या दुखण्यामुळे आजारी आहेत. पायावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे त्यांना डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासाठी लंगर कुटुंबीयांनी तीस ते पस्तीस हजार रुपये गोळा केलेले होते. तेसुद्धा आगीमध्ये जळून खाक झाले. त्यामुळे ताराबाईंच्या शस्त्रक्रियेबाबत कुटुंबीयांना चिंता लागलेली असून, पैशाविना शस्त्रक्रिया कशी करायची, असा यक्ष प्रश्‍न या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: burn money for surgery