विद्यार्थी संख्या १५ वरून तब्बल २२५ वर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

कार्यक्षम शिक्षकामुळे रूप पालटले...
एखाद्या शाळेला कार्यक्षम शिक्षक लाभल्यास त्या शाळेचे रूप पालटते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, गुणवत्ता व संस्कार रुजू लागतात. असेच काम जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संतोष गावडे या शिक्षकाने केल्यामुळेच बुरुंगलेवस्ती जिल्हा परिषद शाळा ही आंतरराष्ट्रीय शिक्षण देणारी मराठी शाळा म्हणून उदयास आल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली. या शिक्षकाच्या नियुक्तीमुळे बहुतांश खासगी शाळेतील प्रवेश जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले आहेत.

सांगवी - जिल्हा परिषद शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जा देणारा ‘तेजस’ हा राज्य सरकारचा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील दहा जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बारामती तालुक्‍यातील निरावागज गावातील बुरुंगलेवस्ती या शाळेचा समावेश असून, या ठिकाणी वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. त्यामुळेच या शाळेची पटसंख्या आता पंधरावरून तब्बल सव्वादोनशेवर गेली आहे.

नीरावागज गावातील बुरुंगलेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळा फक्त पंधरा पटसंख्या असल्याने ती बंद पडण्याच्या अवस्थेत होती. परंतु पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या प्रयत्नातून तेजस उपक्रमांतर्गत ही शाळा आता आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाची शाळा होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ४२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बारामती तालुक्‍यासह सातारा तालुक्‍यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बुरुंगलेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विश्वास देवकाते यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या वेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, सदस्य भारत गावडे, राहुल झारगड, रतन भोसले, अमित देवकाते, बाळासाहेब देवकाते, दीपक मलगुंडे, मुख्याध्यापक वनिता साळुंखे उपस्थित होते. दरम्यान नीरावागज येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची घोड्यावरून, बैलगाडीतून, सजविलेल्या ट्रॉलीमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना खाऊ, तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.  प्रास्ताविक मुख्याध्यापक गावडे, सूत्रसंचालन प्रा. ज्ञानदेव बुरुंगले, तर आभार सुधीर देवकाते यांनी मानले.

तेजस आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांच्या गुणवत्तेचा विचार करून त्यांची निवड केली जाणार आहे. या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध होणार असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचविणार आहे.
- विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burungalewasti ZP School Student Increase