झोपेत असतानाच बस दरीत कोसळली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

काळजी अन्‌ धाकधूक
अपघाताची माहिती मिळताच मूळ गावाकडील, तसेच मुंबईकडील नातेवाइकांसह मित्रमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णांची प्रकृतीची माहिती घेण्यासाठी धडपड सुरू होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्या रुग्णाबाबत काळजी आणि मनात धाकधूक होती.

पिंपरी - पहाटे साडेचारची वेळ...बसमधील सर्व जण झोपलेले... रस्त्यावरील एका वळणावर थोडा झटका बसल्याचे जाणवले व काही कळायच्या आत बस दरीत कोसळली. अंधार असल्याने काय झाले काहीच कळेना. मागील सीटवरील प्रवासी पुढे येऊन आदळले. काही जण खिडकीतून बाहेर पडले. जखमींचा प्रचंड आक्रोश सुरू झाला. दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून बचावलो. अंगावर शहारा आणणारा प्रसंग खंडाळा येथील बोरघाटात झालेल्या बस अपघातातील जखमी सागर शिवाजी सिंगान यांनी कथन केला.

सागर म्हणाले, ‘‘मुंबईत नोकरीला असून कराड तालुक्‍यातील कोळे या मूळ गावी दिवाळीसाठी आलो होतो. दिवाळी झाल्याने रविवारी (ता. ३) रात्री साडेदहाच्या सुमारास खासगी बसने कुटुंबीयांसह मुंबईकडे निघालो. बहुतांश प्रवासी कराड परिसरातीलच होते. मी पंधरा क्रमांकाच्या सीटवर बसलो होतो. सोमवारी (ता. ४) पहाटे साडेचारच्या सुमारास बोरघाटातील गारमाळ येथील वळणावर सुरवातीला बसला थोडा झटका बसला. त्यानंतर बस रस्ता सोडून घाटात कोसळली. सर्वत्र अंधार आणि सर्व जण झोपेत होते. काय झाले कोणालाच काही समजेना. कोसळत असताना बस कलल्याने मागील सीटवरील प्रवासी पुढे येऊन आदळले. यामुळे अनेकांना गंभीर इजा झाली. अनेक जण जीव वाचविण्यासाठी बसच्या बाहेर पडू लागले. मीदेखील खिडकीतूनच बाहेर पडलो. तोंडाला, कानाला इजा झाल्याने रक्तस्राव सुरू होता. तरीही नातेवाइकांसह इतर प्रवाशांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दैव बलवत्तर म्हणून माझ्यासह माझे नातेवाईक बचावले.’’ 

जखमींची नावे
निगडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल : सागर शिवाजी सिंगान, शुभांगी शेळके, फाहीम अन्सारी, पल्लवी हरपळे, गणेश खाडे, सविता बेलदार, स्वप्नील तुळे, शिवम जाबाळे, भक्ती हरपडे, प्रतीक पाटील, 
अविनाश यादव, रमेश देसाई, शुभांगी साळुंके, भगत सत्पाल, सागर सकपाळ, जयप्रकाश घारे, अमर सुपागडे, मोहन कदम, कांचन देसाई, संजय पवार, अजय गायकवाड, भास्कर जाधव, कृष्णा प्रकाश मदने, जय साळुंके, सुहास शिंदे, ओंकार साळुंके, हर्षल पारेख, संतोष मोहोत.

लोणावळ्याजवळ पाच जणांचा मृत्यू
लोणावळा - पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली (जि. रायगड) हद्दीत दस्तुरी गारमाळ येथे खासगी बसचालकाचा ताबा सुटल्याने बस ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चिमुरडीसह पाच जणांचा मृत्यू; तर ३० जण जखमी झाले. सोमवारी (ता. ४) पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. 

सर्वज्ञा सचिन थोरात (वय ३, रा. कराड), स्नेहा जनार्दन पाटील (वय १५, रा. घाटकोपर), जनार्दन पाटील (वय ४५, रा. घाटकोपर), संजय शिवाजी राक्षे (वय ५०, रा. पवई) व प्रमिला रामचंद्र मोहिते (वय ५०, रा. बेलवडे बुद्रुक, कराड) अशी मृतांची नावे आहेत. कराड-ठाणे लक्‍झरी बसच्या चालकाचा बोरघाटात जुन्या महामार्गावर गारमाळनजीक तीव्र उतार व वळणावर अंदाज न आल्याने बसवरील ताबा सुटला. यामुळे बस ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. अपघातात चार प्रवाशांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३० जण जखमी झाले. जखमींपैकी १५ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

रस्तेविकास महामंडळाचे देवदूत पथक, लोणावळा, खोपोली, बोरघाट वाहतूक पोलिस मदत केंद्राचे कर्मचारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus collapse in valley Accident