बीआरटी मार्गातूनच बससेवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पिंपरी - निगडी-दापोडी रस्त्यावर बीआरटीसाठी तयार केलेल्या स्वतंत्र मार्गावरून बससेवाच सुरू ठेवली जाईल, त्या मार्गात मेट्रोचे खांब उभारण्यात येणार नाहीत. महापालिका आयुक्तांनी केलेली ही सूचना महामेट्रोने मान्य केली आहे. त्यामुळे आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून खराळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बीआरटी मार्गावर उभारण्यात येत असलेल्या मेट्रोच्या तीन खांबांबाबत आता प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पिंपरी - निगडी-दापोडी रस्त्यावर बीआरटीसाठी तयार केलेल्या स्वतंत्र मार्गावरून बससेवाच सुरू ठेवली जाईल, त्या मार्गात मेट्रोचे खांब उभारण्यात येणार नाहीत. महापालिका आयुक्तांनी केलेली ही सूचना महामेट्रोने मान्य केली आहे. त्यामुळे आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून खराळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बीआरटी मार्गावर उभारण्यात येत असलेल्या मेट्रोच्या तीन खांबांबाबत आता प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

‘बीआरटीत मेट्रोला नो एन्ट्री’ ही बातमी ‘सकाळ’ने एक मे रोजी प्रसिद्ध केली होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बीआरटी बससेवेच्या सुरक्षिततेबाबतची चाचणी याचिकाकर्त्यासमवेत घेतली. उच्च न्यायालयाने ती चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येईल. न्यायालयाने मान्यता दिल्यास बीआरटी बससेवा निगडीपासून दापोडीमार्गे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ठाम भूमिका घेत बीआरटी मार्गातून मेट्रोला परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. 

याबाबत महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम म्हणाले, ‘‘हर्डीकर हे मेट्रोचेही संचालक आहेत. हर्डीकर यांनी बीआरटी आणि मेट्रो याबाबत विचार करूनच निर्णय घेतला असणार. आमचा बीआरटीला विरोध नाही. त्यामुळे हर्डीकर यांनी केलेली सूचना आम्हाला मान्य आहे. मेट्रोला आता खराळवाडीपासून मोरवाडीपर्यंतचा मेट्रो खांबांसाठी पुन्हा आराखडा करावा लागेल. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबतचा आराखडा करण्याचे काम सुरू आहे.’’

पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रोने १२६ फाउंडेशन घेतले असून, ७४ खांब उभारले आहेत. आणखी ३३ खांब अर्धवट उभारलेले आहेत. व्हायाडक्‍ट आठ खांबांवर उभारले असले, तरी त्यांचे पुढील काम सध्या रेंगाळले आहे. मेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत वेगाने काम केले असले, तरी पुण्यात जाताना बोपोडीत रस्ता रुंदीकरणामुळे मेट्रोचे काम अद्याप सुरू झालेले नाही. तर, पुढील अडीच किलोमीटर जागा संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे. संरक्षण विभागाकडून काम सुरू करण्याची परवानगी अद्याप मिळालेली नसल्यामुळे, खडकी ते रेंजहिल्स येथील काम सुरू झालेले नाही.

वाहतूक वर्षभर वळविणार
नाशिक फाटा येथील मेट्रो उभारणीचे काम येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम यांच्यासह दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या परिसराची पाहणी केली. नाशिक फाटा येथील पुलाच्या रॅम्पजवळून कासारवाडी रेल्वेस्थानकासमोरील सेवा रस्त्यावरून मेट्रो मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे, पुढील वर्षभर तेथील वाहतूक अन्यत्र वळवावी लागणार आहे.

Web Title: Bus service from BRT route