बसची लटकंती कधी थांबेल?

Bus-Student
Bus-Student

पौड रस्ता - कोथरूड बस स्टॅंड मार्गे आलेली ती बस प्रवाशांनी ठासून भरलेली होती. परीक्षेला वेळेत पोचायचे असल्याने त्या मुलांनी पूर्ण ताकदीनिशी बसमधील प्रवाशांना ढकलत कसे बसे पायरीवर आपले पाय टेकवले. दप्तराची सॅक व आपले अर्धे अंग बाहेर, बसचे दांडके दंडामध्ये अडकवत कसरत करत ही मुले बसमधून प्रवास करत होती. पीएमपी बसचा कंडक्‍टरही पुढच्या दरवाजातून प्रवासी खाली पडू नये म्हणून आपल्या हाताने दरवाजा रोखून धरत उभा होता. रस्त्यावर गर्दी असल्याने सुदैवाने बसचा वेग कमी होता. पण प्रवाशांची कसरत पाहणाऱ्या रस्त्यावरील लोकांचे काळीज मात्र काही अघटित तर होणार नाही ना या भीतीने थरथरत होते.

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसची संख्या वाढविणे गरजेचे होते. परंतु, अद्यापही पुरेशा बस उपलब्ध नसल्याचे दिसते. 

कोथरूड येथील सागर कॉलनीत राहणारे नितीन गायकवाड म्हणाले की, मेट्रो स्टेशन पर्यंत पोचायला प्रवाशांना बस आणि रिक्षा लागतील, असे संशोधन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले आहे. जे विद्यार्थ्यांना समजले ते मेट्रोला कसे समजले नाही? विविध प्रकल्पांसाठी सल्लागार नेमतो मात्र त्यासाठी कोट्यवधी रुपये मोजतो. या सल्लागारांना ही बाब लक्षात आली नाही का? त्यामुळे आता या सल्लागारांमुळे ज्या ज्या प्रकल्पांचे नुकसान झाले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात. प्रवाशांच्या सोयीसाठी कोथरूड डेपोमध्ये नव्या इलेक्‍ट्रीक बस मिळाव्यात, अशीही मागणी नितीन गायकवाड यांनी केली. युवराज मदगे म्हणाले, कोथरूडमधील नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या बसची संख्या कमीच आहे. या भागात बसची संख्या वाढणार असे चार वर्षांपासून ऐकत आहे. किमान शाळा, कार्यालयीन वेळेत तरी जादा बस सोडायला हव्यात.

मला टिळक रोडला दहावाजेपर्यंत कामावर पोचायचे होते. अर्धा तास झाला, मी येथे बस थांब्यावरच उभी आहे. सलग चार बस फुल्ल भरलेल्या होत्या. पायरीवर उभे राहायलासुद्धा जागा नव्हती.
- राजश्री मोरे, प्रवासी, कर्वेनगर

सरकार पुणे मेट्रोवर जेवढा खर्च करते आहे त्यातील दहा टक्के जरी खर्च पीएमपीएमएलच्या नव्या बस साठी केला असता तरी, प्रवाशांचा त्रास कमी झाला असता.
- शंकर शिंदे, प्रवासी, कर्वे पुतळा चौक

कोथरूड मार्गावरील बसने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे सत्तर हजार आहे. आम्ही प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करतो.
- चंद्रकांत वर्पे, व्यवस्थापक, कोथरूड बस डेपो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com