
Pune Crime : कौटुंबिक वादातून व्यावसायिक महिलेवर कटरने हल्ला; पाच जणांवर गुन्हा दाखल
नारायणगाव : कौटुंबिक वादातून व्यावसायिक महिलेला मारहाण करून, कटरने वार करून जखमी केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आर्वी फाटा(ता.जुन्नर)येथे घडली.महिलेवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या हल्ल्यात शांताबाई मारुती शिंदे (वय ४८ , राहणार आर्वी, ता.जुन्नर)ही महिला जखमी झाली आहे.या प्रकरणी अण्णासाहेब शिंदे, विशाल शिंदे (दोघेही राहणार राहुरी, जिल्हा नगर), प्रकाश शिंदे (रा.साकुर, जिल्हा नाशिक), शैलेश लोखंडे, जयेश उर्फ गणेश शिंदे(राहणार वैदवाडी,ता.सिन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांताबाई शिंदे यांची नारायणगाव - जुन्नर रस्त्यालगत आर्वी फाटा येथे पानटपरी आहे.शांताबाई शिंदे यांच्या दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत.मात्र कौटुंबिक वादामुळे दोन्ही सुना माहेरी नाशिक व सिन्नर येथे रहात आहेत. आज दुपारी शांताबाई शिंदे या पान टपरीत असताना दोन्ही सुनाचे भाऊ व इतर नातेवाईक आले.
त्यांनी शांताबाई शिंदे यांच्याकडे आधार कार्ड व इतर कागदपत्रे मागीतली.शांताबाई शिंदे यांनी देण्यास नकार दिला. या वरून झालेल्या बाचाबाचीतुन शांताबाई शिंदे यांना मारहाण करून, कटरने हल्ला करून आरोपी फरार झाले.या प्रकरणी शांताबाई शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी पाच जणांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.