व्यावसायिकांनी स्वीकारावा "कॅशलेस'चा बदल

योगिराज प्रभुणे - @yogirajprabhune
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

रोख रक्कम खिशात असणे ही अडचणीच्या काळात एक आधार असतो, हे आपल्या मनामध्ये पक्के बसले आहे. खिशात दोन-चार हजार रुपये असले, की "खिसा गरम' असल्याची भावना असते. भले ते पैसे महिनोंमहिने खर्च केले नाही किंबहुना काटकसरी वृत्तीमुळे ते होणारही नाहीत; पण पैसे खिशात आहेत, हा काहींसाठी मोठा दिलासा असतो. अशा अनेक व्यक्ती आपल्या भोवती असतात. देशातील चलनातून हजार-पाचशे रुपयांच्या नोटा तडकाफडकी बंद केल्यानंतर सर्वांत मोठा "धक्का' अशा लोकांना बसला.

रोख रक्कम खिशात असणे ही अडचणीच्या काळात एक आधार असतो, हे आपल्या मनामध्ये पक्के बसले आहे. खिशात दोन-चार हजार रुपये असले, की "खिसा गरम' असल्याची भावना असते. भले ते पैसे महिनोंमहिने खर्च केले नाही किंबहुना काटकसरी वृत्तीमुळे ते होणारही नाहीत; पण पैसे खिशात आहेत, हा काहींसाठी मोठा दिलासा असतो. अशा अनेक व्यक्ती आपल्या भोवती असतात. देशातील चलनातून हजार-पाचशे रुपयांच्या नोटा तडकाफडकी बंद केल्यानंतर सर्वांत मोठा "धक्का' अशा लोकांना बसला.

कारण, वयाच्या 45-50 वर्षांपर्यंत प्रत्येक व्यवहार रोखीने करण्यास प्राधान्य देणाऱ्या या नागरिकांना "प्लॅस्टिक मनी', "कॅशलेस व्यवहार', "मोबाईल वॉलेट', "ऑनलाइन ट्रान्सफर' या माध्यमातून दैनंदिन व्यवहार करणे अडखळल्यासारखे वाटते. नागरिकांची जशी ही अवस्था आहे, तशीच दुसरी बाजू व्यापाऱ्यांचीही आहे. वर्षानुवर्षे रोखीने व्यवहार करणाऱ्या कापड दुकानांपासून ते किराणा मालाच्या भुसार माल विक्रेत्यांपर्यंत ही नवी पद्धत स्वीकारणे अवघड जात आहे. पण, संपूर्ण देश एका संक्रमणावस्थेतून जात आहे. आपणही याच संक्रमणावस्थेचे साक्षीदार आहोत. अशा वेळी एक हजारच्या वरच खरेदी केली तर, स्वाइप कार्ड स्वीकारणार अशी आडमुठेपणाची भूमिका घेऊन सामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याची भूमिका काही व्यापाऱ्यांची होती. ती निश्‍चितच योग्य नाही.

पुण्यातील किराणामालाच्या काही दुकानदारांनी हा आडमुठेपणा केला होता. हजार रुपयांची खरेदी केल्याशिवाय कार्ड "स्वाइप' न करण्याचा स्वयंघोषित नियम काही दुकानांमध्ये लागू केला होता. त्यापैकी धायरी येथील बालाजी ट्रेडर्स या दुकानासमोर भारतीय जनता युवा मोर्चाने आंदोलन करून हा स्वयंघोषित नियम बाजूला ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर व्यापाऱ्याने ते मान्य केले. हे आपल्या समोरील बोलके उदाहरण आहे.

बॅंका आणि एटीएम यांच्या पुढील रांगा अद्यापही कायम आहेत. दैनंदिन घरखर्चासाठी लागणाऱ्या सुट्या पैशांची "किंमत' वाढली आहे. हे चित्र शहरात एकीकडे दिसत आहे, तर दुसरीकडे चहावाल्यापासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत आणि भाजी विक्रेत्यांपासून ते किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनी स्वाइप मशिन घेतल्याचेही दिसते. अनेकांनी "मोबाईल वॉलेट'शी आपली नाळ जोडली. तर, काहींनी "ऑनलाइन' बॅंकिंगही सुरू केले. थोडक्‍यात, पुणेकरांनी आपल्या दैनंदिन व्यवहाराचे माध्यम अगदी सहजतेने बदलले आहे. अशा वेळी किराणा मालाच्या व्यापाऱ्यांनी स्वतःच्या नियमांनी व्यवसाय करून सामान्य ग्राहकांची गैरसोय करणे हे निश्‍चित योग्य नाही. "ऑनलाइन', "व्हर्च्युअल' किंवा "मोबाईल', "कॅशलेस' याच भविष्यातील व्यवहाराच्या पद्धती आहेत. त्याचा स्वीकार करणे हेच या पिढीतील व्यावसायिकांसाठी हिताचे आहे. ही बदलाची नांदी आहे. त्या प्रमाणे बदल न केल्यास तीव्र होत जाणाऱ्या स्पर्धेतून बाजूला पडण्याचाही धोकाही यात आहे, याचा विसर आधुनिक काळातील व्यवसायिकांना पडू नये.

Web Title: businessman accept cashless facility