आंबेठाण बाह्यवळण रस्त्याला मुहूर्त कधी? 

रुपेश बुट्टे
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

खेड तालुक्यातील आंबेठाण येथील अडीच वर्षांपासून रखडलेल्या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात प्रशासनाची उदासीनता आणि वेळकाढूपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. या मार्गावरील दररोज वाढत असणारी वाहतूक, त्यातून होणारी वाहतूक कोंडी आणि नव्याने होत असलेले रुंदीकरण लक्षात घेता हे बाह्यवळण तत्काळ मार्गी लागणे गरजेचे आहे. 
 

आंबेठाण (पुणे) : येथील अडीच वर्षांपासून रखडलेल्या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात प्रशासनाची उदासीनता आणि वेळकाढूपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. या मार्गावरील दररोज वाढत असणारी वाहतूक, त्यातून होणारी वाहतूक कोंडी आणि नव्याने होत असलेले रुंदीकरण लक्षात घेता हे बाह्यवळण तत्काळ मार्गी लागणे गरजेचे आहे. 

खेड तालुक्यातील चाकण शहर आणि एमआयडीसी यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांपैकी चाकण ते वासुली फाटा हा एक रस्ता आहे. साधारणतः दोन ते अडीच वर्षांपूर्वी आंबेठाणच्या उत्तरेला असणाऱ्या गावतळ्याच्या कडेने आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागून हा नवीन बाह्यवळण रस्ता तयार करण्याला सुरवात केली होती. आंबेठाणच्या पूर्वेपासून चाकण-वांद्रा रस्त्यापासून हा रस्ता निघून गावाच्या उत्तरेला असणाऱ्या बोरदरा रस्त्यापर्यंत आणून पुन्हा चाकण-वांद्रा रस्त्याला हा रस्ता जोडणे, असे या कामाचे स्वरूप होते.

काम सुरू झाले असता काही नागरिकांनी रस्त्यात जागा जाते म्हणून काम बंद पाडले. त्यानंतर पुन्हा त्यातून मार्ग काढून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. त्या वेळी एक मोरीही बांधण्यात आली. पण, पुन्हा तळ्याजवळ जागामालकाने हरकत घेऊन काम बंद पाडले. तेव्हापासून आजपर्यंत हे काम बंद आहे. 

सध्या या मार्गाचे रुंदीकरणासह नूतनीकरण केले जात आहे. त्यात हे बाह्यवळण मार्गी लागणे अपेक्षित आहे. परंतु, या कामात संपादन नसल्याने बाह्यवळण रखडण्याची चिन्हे आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक पुढारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन मार्ग काढणे गरजेचे आहे. जागा जाणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून काम पूर्ण कसे होईल, हे पाहणे गरजेचे आहे. 

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही बाह्यवळण मार्गी लागावे, यासाठी प्रांत कार्यालयात मागणी केली आहे. 

प्रशासनाने ठोस पावले उचलावीत 
या परिसरात औद्योगिकीकरण वाढत आहे. त्यातून या भागात कंटेनर, अवजड आणि मोठी वाहने येण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच, या गावठाण भागात दोन ठिकाणी 90 अंश असणारी वळणे आहेत. त्यामुळे वाहने वळताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय, या मार्गावरून चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनकडे आणि भामा आसखेड धरणाकडे जाता येते. त्यामुळे हा मार्ग सदैव वाहतुकीचा असतो. प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका न घेता याबाबत ठोस पावले उचलून यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bypass Road work in Ambethan was halted