‘सीएए’, ‘एनआरसी’ काळे कायदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

‘महात्मा गांधी यांनी सर्वांवर प्रेम करायला शिकविले आहे. मात्र, त्यांचे हे विचार आजही काही लोकांना भावत नाहीत. आपला कायदा हा जात, धर्म, भाषा, प्रदेशावर नागरिकत्व ठरविणारा नाही. त्यामुळे ‘सीएए’ व ‘एनआरसी’ची नोंद काळा कायदा म्हणून होईल,’’ असे मत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

पुणे - ‘‘महात्मा गांधी यांनी सर्वांवर प्रेम करायला शिकविले आहे. मात्र, त्यांचे हे विचार आजही काही लोकांना भावत नाहीत. आपला कायदा हा जात, धर्म, भाषा, प्रदेशावर नागरिकत्व ठरविणारा नाही. त्यामुळे ‘सीएए’ व ‘एनआरसी’ची नोंद काळा कायदा म्हणून होईल,’’ असे मत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधी अहिंसात्मक जनआंदोलन’ या विषयावर महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सभा आयोजित करण्यात आली होती, त्यात मातोंडकर बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, बिशप थॉमस डाबरे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, अभय छाजेड उपस्थित होते. ‘सत्याग्रही’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन, तर ‘एनआरसी’ या शेखर सोनाळकरलिखित पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

सेटलवाड म्हणाल्या, ‘‘नागरिकत्व सुधारणा कायदा जाती-धर्मात रेषा निर्माण करणार आहे. जगात कुठेही नागरिकांना कागदपत्रांच्या आधारे पारखले जात नाही.’’ बिशप डाबरे यांचे भाषण झाले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ गांधी भवनबाहेर आंदोलन करणाऱ्या हिंदुराष्ट्र सेनेच्या ३० ते ३५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सरकार नागरिकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार असेल, तर पुन्हा निवडणूक होऊ द्या. जनतेचा अपमान करू नये, हे राज्यकर्त्यांना ठासून सांगण्याची वेळ आली आहे. मायभूमी काढून घेत ती सरकार त्यांच्या मालकांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. या कायद्यामुळे ४० कोटी लोक देशोधडीला लागतील.
- डॉ. कुमार सप्तर्षी, अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAA NRC black laws urmila matondkar