कॅबचालक होतोय ओला-उबरला कनेक्‍ट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

कॅब व्यवसायासाठी मी अनेक दिवसांपासून ओला आणि उबरचा वापर करीत आहे. एखाद्या भागात असताना, तेथे प्रवासी मिळाले नाहीत, तर दुसऱ्या कंपनीच्या ऍपवर ऑनलाइन गेल्यास लगेच प्रवासी मिळू शकतात. आलटून-पालटून असा बदल केल्यामुळे दिवसाच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठता येते.
- शेखर लोहे, कॅबचालक

उत्पन्न वाढविण्यासाठी नवा फंडा; कॅबचीही वाढतेय उपलब्धता
पुणे - अधिकाधिक प्रवासी गाठून उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक कॅबचालकांनी ओला आणि उबरचा वापर करण्यास सुरवात केली आहे. चालकांच्या या नव्या फंड्यामुळे प्रवाशांसाठी कॅबची उपलब्धता वाढली आहे.

पीएमपी, रिक्षांबरोबरच प्रवाशांना शहरात आता कॅबचा मिळालेला पर्याय स्थिरावला आहे. प्रवास करण्यापूर्वीच किती प्रवासी भाडे द्यावे लागणार आहे, हे समजत असल्यामुळे प्रवाशांना सोयीचे होत आहे. तसेच चार प्रवासी असेल तर, कॅबचा पर्याय परवडतो. रिक्षा- बसच्या तुलनेत थोडे जादा पैसै द्यावे लागत असले तरी, वातानुकूलित मोटारीतून प्रवास करता येत असल्यामुळे कॅब लोकप्रिय होऊ लागली आहे. शहरातील कॅबची संख्या सुमारे 20-25 हजारांवर पोचली आहे. सुट्यांचा हंगाम तसेच लग्नसराईमुळे कॅबची मागणी वाढली आहे. अनेक कॅबचालकांनी आता ओला आणि उबरकडेही नोंदणी केली आहे. स्वतःची मोटारचालकांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. चालक ज्या भागात आहे, त्या भागात त्याला प्रवासी मिळत नसेल तर त्या कंपनीच्या ऍपवर तो ऑफलाइन जातो आणि दुसऱ्या कॅब कंपनीचे ऍप सुरू करतो. त्यावर ऑनलाइन असल्यामुळे त्याला प्रवासी मिळतात. दुपारी एक ते सायंकाळी चार-साडेचार वाजेपर्यंत कॅबला मागणी कमी असते. त्या वेळात अनेक कॅबचालक असे "स्वीचओव्हर' करू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांनाही कॅब उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे.

स्वतःची मोटार वापरणाऱ्या चालकांना याबाबत कॅब कंपन्यांकडूनही आडकाठी करण्यात येत नाही. कारण, चालकाने केलेल्या फेरीचे कमिशन कंपन्यांना मिळत आहे. चालक हा फंडा वापरत असल्यामुळे त्यांचे उत्पन्न दिवसाला 1500 ते 1700 रुपयांपर्यंत पोचले आहे. त्यातून 15-20 टक्के कंपन्यांना कमिशन जाते. सीएनजी अथवा डिझेलचा खर्च वगळता चालकांना सुमारे 700 ते 800 रुपये मिळू लागले आहेत.

कॅब व्यवसायासाठी मी अनेक दिवसांपासून ओला आणि उबरचा वापर करीत आहे. एखाद्या भागात असताना, तेथे प्रवासी मिळाले नाहीत, तर दुसऱ्या कंपनीच्या ऍपवर ऑनलाइन गेल्यास लगेच प्रवासी मिळू शकतात. आलटून-पालटून असा बदल केल्यामुळे दिवसाच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठता येते.
- शेखर लोहे, कॅबचालक

स्वतःची मोटार असलेल्या चालकांना एकाच कॅब कंपनीवर अवलंबून राहून पुरेसा व्यवसाय मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे 60-70 व्यावसायिक दोन्ही कॅब कंपन्यांसाठी काम करीत आहे. त्यामुळे प्रवाशांनाही कॅब उपलब्ध होतात व चालकालाही अधिक व्यवसाय मिळतो.
- गणेश नाईकवाडे, मनसे कॅब संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cab Driver Ola Uber Connect