पुण्यातील ‘कॅब’ची संख्या दहापट वाढली

मंगेश कोळपकर
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

पुणे - सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय नसल्यामुळे शहरातील ‘कॅब’ची संख्या वाढून आता ३३ हजारांवर पोचली आहे. मागील सुमारे चार वर्षांत कॅबची संख्या दहापट वाढली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कॅब’ने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर कॅब कंपन्यांना संलग्न रिक्षांचीही संख्या दोन्ही शहरांत मिळून १० हजारपेक्षा जास्त झाली आहे.

पुणे - सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय नसल्यामुळे शहरातील ‘कॅब’ची संख्या वाढून आता ३३ हजारांवर पोचली आहे. मागील सुमारे चार वर्षांत कॅबची संख्या दहापट वाढली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कॅब’ने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर कॅब कंपन्यांना संलग्न रिक्षांचीही संख्या दोन्ही शहरांत मिळून १० हजारपेक्षा जास्त झाली आहे.

शहरांतर्गत वाहतुकीसाठी प्रवाशांना बस, रिक्षाचे पर्याय आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यात ओला - उबरची भर पडली आहे. लोकसंख्या वाढत असल्यामुळे गतिमान आणि सुरक्षित वाहतुकीसाठी ओला- उबरचा पर्याय लोकप्रिय ठरत आहे. ओला- उबरकडे नेमक्‍या किती वाहनांची नोंदणी आहे, हे त्या कंपन्या जाहीर करीत नाहीत. मात्र, व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) त्यांची नोंदणी होते. गेल्या चार वर्षांत व्यावसायिक वापराच्या वाहनांची वाढलेली नोंदणी ओला- उबेरमुळे असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. 

ओला- उबेरच्या चालकांना महिन्याला सुमारे २५-३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पन्नाच्या सुरक्षिततेमुळे अनेक युवक कंपन्यांशी संपर्क साधत आहेत. स्वतःची मोटार किंवा कंपनीकडून मिळणारी भाडेतत्त्वावरील मोटार हे पर्यायही त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत, असे कंपन्यांकडून सांगण्यात आले.

टॅक्‍सी कॅबअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. विविध कंपन्या, टूरसाठी त्यातील सुमारे ३० टक्के गाड्या गृहीत धरल्या तर, ओला- उबरसारख्या कंपन्यांच्या सुमारे पुण्यात सुमारे १७-१८ हजार कॅब असाव्यात, असा अंदाज आहे. 
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

कॅब कंपन्यांमधील गाड्यांची संख्या वाढत आहे. परिणामी, दीड-दोन हजार रुपयांचा व्यवसाय करण्यासाठीही चालकांना १२-१४ तास काम करावे लागत आहे. या कंपन्यांवर नियंत्रण आवश्‍यक आहे. 
- गणेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष, मनसे वाहतूक सेना 

रिक्षाच्या तुलनेत कॅबला पैसे थोडे जास्त असले तरी, ही सेवा सुरक्षित आहे. प्रवासी भाडे, सुटे पैसे यावरून चालकाशी वाद होत नाहीत. वेळेवर पोचत असल्यामुळे मी  कॅबचाच वापर करते. 
- गौरी शेट्ये, प्रवासी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cab Increase in Pune Traffic