#CabSurge कॅबचा नकार तरी प्रवाशांना भार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

पुणे - पाऊस पडतोय आणि प्रवासासाठी तुम्ही कॅब मोबाईलवरून बुक केली. १५-२० मिनिटांनंतर चालकाचा फोन येतो आणि सांगतो, मला फेरी शक्‍य नाही. माझ्याकडून फेरी कॅन्सल होत नाही. तुम्ही कॅन्सल करा आणि दुसरी कॅब बुक करा. प्रवाशाने कॅब कॅन्सल केली की, त्याचा भुर्दंड त्याला बसतो अन्‌ कॅबही मिळत नाही. त्यातून मात्र कॅब कंपन्या आणि चालकाची प्रवास न करताही उत्पन्नाची चंगळ होते!

पुणे - पाऊस पडतोय आणि प्रवासासाठी तुम्ही कॅब मोबाईलवरून बुक केली. १५-२० मिनिटांनंतर चालकाचा फोन येतो आणि सांगतो, मला फेरी शक्‍य नाही. माझ्याकडून फेरी कॅन्सल होत नाही. तुम्ही कॅन्सल करा आणि दुसरी कॅब बुक करा. प्रवाशाने कॅब कॅन्सल केली की, त्याचा भुर्दंड त्याला बसतो अन्‌ कॅबही मिळत नाही. त्यातून मात्र कॅब कंपन्या आणि चालकाची प्रवास न करताही उत्पन्नाची चंगळ होते!

पावसामुळे सध्या रिक्षा, कॅबला प्रवाशांकडून मागणी वाढत आहे. प्रवास न करताही कॅबचा भुर्दंड बसणाऱ्या एका प्रवाशाने त्याची व्यथा ‘सकाळ’कडे मांडली. एका प्रवाशाने प्रवासासाठी कॅब बुक केली. मात्र, १५-२० मिनिटांनंतरही चालक त्यांच्यापर्यंत पोचेना. त्यामुळे त्यांनी कॅब रद्द केली. तेव्हा ४२ रुपये कॅन्सलेशन चार्ज म्हणून त्यांना भुर्दंड बसला. त्यांनी तातडीने कॅब कंपनीकडे तक्रार केली.

त्यानंतर त्यांनी त्या प्रवाशाचे ४२ रुपये परत केले. परंतु, या प्रक्रियेत त्यांना कॅब मिळाली नाही अन्‌ वेळही वाया गेला. अशाच प्रकारचा अनुभव आणखी एका प्रवाशाला आला. त्याने कॅब बुक केल्यावर १०-१५ मिनिटांनंतर चालकाचा त्यांना फोन आला. ‘ही ट्रिप मला करता येत नाही. परंतु, माझ्याकडून कॅन्सलेशन होत नाही. त्यामुळे तुम्ही ट्रिप कॅन्सल करा,’ अशी विनंती त्याने केली. त्यामुळे त्यांनी ट्रिप कॅन्सल केली. तेव्हा त्यांनाही ४० रुपयांचा भुर्दंड बसला.  संबंधित कंपनीकडे पाठपुरावा केल्यावर ही रक्‍कम वळती केली.

काही प्रवासी सतर्क राहिले म्हणून भुर्दंड वाचला. परंतु, अनेक प्रवासी चालकाच्या सूचनेप्रमाणे कॅबची फेरी कॅन्सल करतात अन्‌ त्यांना भुर्दंड बसतो. कॅबची मागणी जास्त असताना, असे प्रकार वारंवार घडत असल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे.

सरचार्ज देऊनही कॅन्सलेशन 
कॅबची मागणी जास्त असताना, कंपन्या सरचार्ज आकारतात. गरज असते म्हणून प्रवासीही ते मान्य करून कॅब बुक करतात. परंतु, जवळची किंवा सोयीची ट्रिप नसेल तर प्रवाशांना ताटकळत ठेवण्याचेही प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कॅब कॅन्सल करण्याशिवाय प्रवाशांना तरणोपाय राहत नाही अन्‌ त्यातूनही कॅब कंपन्या प्रवास न करता कमाई करतात.

कॅब बुक केल्यावर संबंधित चालक दिलेल्या ठिकाणी पोचण्याऐवजी मुद्दाम तेथून दूरवर थांबतो. प्रवासी ट्रिप कधी कॅन्सल करतो, हेच तो पाहत असतो अन्‌ ट्रिप कॅन्सल केल्यावर भुर्दंड बसतो. भुर्दंड बसल्यावर संबंधित कंपनीकडे पाठपुरावा केल्यावर ४२ रुपये परत मिळाले. पण, ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. 
- निरंजन फडके, प्रवासी

कॅब बुक केल्यावर संबंधित चालकाने, त्याला ही फेरी करणे शक्‍य नाही असे सांगितले. त्याच्याकडून तांत्रिक कारणामुळे कॅन्सलेशन होऊ शकत नसल्याचे सांगत त्याने मलाच ट्रिप कॅन्सल करायला सांगितली. मी ट्रिप कॅन्सल केली. परंतु, ४० रुपयांचा भुर्दंड बसला. पाठपुरावा केल्यावर पैसे परत मिळाले. 
- तन्मय कानिटकर, प्रवासी

Web Title: #CabSurge passenger mobile booking