Loksabha 2019 : मतदान केंद्रांवर कॅमेऱ्यांचे लक्ष

Loksabha 2019 :  मतदान केंद्रांवर कॅमेऱ्यांचे लक्ष

पुणे - लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, गैरप्रकार करणाऱ्यांना आळा बसावा, यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून मोबाईल व्हॅनमधील व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे मतदान केंद्रांभोवती बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत याच पद्धतीने मतदान केंद्रांभोवतीचे निरीक्षण केले जाणार आहे. 

पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता.२३) मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांच्या वतीने काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः संवेदनशील; तसेच गुन्हेगारांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

पोलिस ठाण्यांच्या पातळीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गस्तीवर असणाऱ्या मोबाईल व्हॅनमध्ये व्हिडिओ कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. फिरत्या वाहनांमधील पथकांकडून ठिकठिकाणचे मतदान केंद्रांभोवतीचे  चित्रण केले जाणार असल्याने अनुचित घटनांना प्रतिबंध बसणार असल्याचे पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

याबरोबरच सर्व मतदान केंद्रांवर पोलिस ठाण्यांअंतर्गत चार विभाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये चार वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्यासमवेत पोलिस कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या परिसरामध्ये गस्त घालणार आहेत. याबरोबरच सोमवारी सकाळी सात वाजता संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांसमवेत ईव्हीएम मशिन वाटपाच्या ठिकाणी जातील. तिथून त्यांच्यासमवेत मतदान केंद्राच्या ठिकाणी जाणार आहेत. त्यानंतर २३ एप्रिलला मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन ईव्हीएम मशिन मतमोजणीच्या ठिकाणी नेईपर्यंत पोलिस बंदोबस्त असणार आहे. 


लोकसभा निवडणुकीसाठी पोलिस ठाण्यांनी बंदोबस्तासह काय-काय करायला पाहिजे, याबाबतच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आहेत. त्यानुसार मतदान केंद्रांवरील बंदोबस्त असेल. याबरोबरच पेट्रोलिंग करणाऱ्या मोबाईल व्हॅनमध्ये व्हिडिओ कॅमेरे बसविलेले असून, त्याद्वारेही निरीक्षण केले जाणार आहे.
 विष्णू पवार, पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com