#Helmet हेल्मेटसक्तीची मोहीम आरटीओकडून बारगळली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे - हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याची प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मोहीम तीन दिवसांतच बारगळली आहे. मोहिमेसाठी नेमलेल्या वायुवेग पथकात फक्त तीनच अधिकारी असल्यामुळे ही वेळ आली आहे. 

पुणे - हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याची प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मोहीम तीन दिवसांतच बारगळली आहे. मोहिमेसाठी नेमलेल्या वायुवेग पथकात फक्त तीनच अधिकारी असल्यामुळे ही वेळ आली आहे. 

काही दिवसांपूर्वी नियमांचा भंग करून वाहन परवाने दिल्याने प्रादेशिक कार्यालयातील 13 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे कार्यालयातील मनुष्यबळ कमी झाले. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून करण्याची घोषणा "आरटीओ' कार्यालयाने केली होती. त्यासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीन वायुवेग पथकांची स्थापनाही केली होती. परंतु, हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी केली, तर संबंधित अधिकाऱ्यांना इतर कामांकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्यामुळे मोहीम बारगळली आहे. या तीन पथकांनी हेल्मेट न घालणाऱ्या आणि सिटबेल्ट न लावणाऱ्या 100 वाहन चालकांविरोधात खटले दाखल केले आहेत. शहरात दुचाकींची संख्या सुमारे 30 लाख असून, कारवाईसाठी फक्त तीनच अधिकारी आहेत. 

दर गुरुवारी समुपदेशन वर्ग 
राज्य सरकारच्या निर्णयानुसार वायुवेग पथकाकडून ज्या चालकांविरुद्ध खटले दाखल होतील, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यापूर्वी दोन तास रस्ता सुरक्षाविषयक नियमांच्या समुपदेशनासाठी उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहकार सभागृहामध्ये दर गुरुवारी समुपदेशन कार्यशाळा घेण्यात येत आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली. 

वाहन चालविताना नियमांचा भंग करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी परिवहन कार्यालयाने वायुवेग पथकाची नियुक्ती केलेली आहे. सध्या मनुष्यबळाची कमतरता असली तरी, उपलब्ध तीन अधिकाऱ्यांमार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे. 
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

दुचाकींची संख्या - सुमारे 30 लाख 
पथकांकडून कारवाई - 100 वाहनचालक 
वायुवेग पथक - फक्त तीन अधिकारी 

Web Title: The campaign of helmets stops from RTO