प्रचारात एकवटले शिरोळे घराणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक १४ (ड)मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात शिवाजीनगर भागातील शिरोळे घराण्यातील अनेक जण पूर्णवेळ उतरले आहेत.

पुणे - महापालिका निवडणुकीत डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक १४ (ड)मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात शिवाजीनगर भागातील शिरोळे घराण्यातील अनेक जण पूर्णवेळ उतरले आहेत.

शिवाजीनगर परिसरात समाजकारण व राजकारणात कार्य करण्याची शिरोळे घराण्याची दीर्घ परंपरा आहे. या व्यतिरिक्त अन्य अनेक क्षेत्रांत शिरोळे घराण्यातील अनेक जण नावाजलेले आहेत. या घराण्यातील नव्या पिढीतील सिद्धार्थ शिरोळे हे निवडणूक रिंगणात आहेत. शिरोळे घराण्याच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रातील योगदानाविषयी माजी नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांनी माहिती दिली.  
भाऊसाहेब शिरोळे यांनी पुण्याचे महापौरपद भूषविले होते, तर मालतीबाई शिरोळे बारामतीमधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 

तसेच बाळासाहेब शिरोळे हे शहराचे उपमहापौर होते. स्वतः श्रीकांत शिरोळे हे १९६८ आणि १९९२ या दोन निवडणुकांमध्ये पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले होते, तर १९७३-७४ या आर्थिक वर्षात त्यांनी महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते, तसेच खासदार अनिल शिरोळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पतित पावन संघटना, भारतीय जनता पक्ष या संघटनांचे ४५ वर्षांपासून सक्रिय कार्यकर्ते आहेत.

शिरोळे घराण्याचे पुण्याच्या विकासात मोलाचे योगदान आहे. फर्ग्युसन कॉलेज हे १२५ वर्षांपूर्वी शिरोळेंच्या जमिनीवर उभे राहिले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी शिरोळेंनी आपल्या जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. ही त्यागाची परंपरा गेल्या दोन शतकांपासून सुरू आहे व पुढेही सुरू राहील, असे श्रीकांत शिरोळे म्हणाले.

भाऊसाहेब शिरोळे, बी. जी. शिरोळे, धैर्यशील शिरोळे, श्रीरंग शिरोळे, मेजर के. एम. शिरोळे, सी. एल. शिरोळे, सुनील शिरोळे यांच्यासह समाजकारण, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय, इंजिनिअरिंग, लष्कर, वकिली अशा विविध क्षेत्रांत योगदान दिलेल्या नामवंतांचा उल्लेख श्रीकांत शिरोळे यांनी केला.

Web Title: Campaign Shirole family