प्रचाराचा ‘सुपर संडे’

प्रचाराचा ‘सुपर संडे’

प्रभागांमधील जनसंपर्क वाढविण्याच्या उद्देशाने काढलेल्या प्रचारफेऱ्या, दुचाकी रॅली आणि मतदारांच्या गाठीभेटींमुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी शहरभरातील राजकीय वातावरण तापले. या निमित्ताने आपापल्या प्रभागांमध्ये वातावरणनिर्मिती करीत, विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपली ताकद दाखवीत शक्तिप्रदर्शन केले. काही प्रभागांमध्ये प्रचारफेऱ्या समोरासमोर आल्याने कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने वातावरण ढवळून निघाले. शहरातील ४१ प्रभागांमधील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराचा घेतलेला आढावा.

घोषणांच्या निनादाने परिसर दुमदुमला
घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय

पुणे - ‘आला रे आला....’, ‘इकडून आले, तिकडून आले.....’, ‘वच्छा वच्छा....’, ‘वाजली रे वाजली.....’ व  ‘आली रे आली...’ अशा विविध घोषणांच्या निनादात पुणे विद्यापीठ- वाकडेवाडी (प्रभाग क्र. ७), डेक्कन जिमखाना- मॉडेल कॉलनी (प्र. १४) आणि कसबा पेठ- सोमवार पेठ (प्र. १६) प्रभागांतील प्रचाराची रविवारी वाजत- गाजत सांगता झाली.

 पुणे विद्यापीठ- वाकडेवाडी प्रभागात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व मनसेच्या उमेदवारांनी प्रभागात सकाळपासूनच रॅली व पदयात्रा काढल्याचे चित्र दिसून आले. पक्षाचे झेंडे घेऊन निघालेला कार्यकर्त्यांचा ताफा व घोषणांच्या निनादामुळे प्रमुख रस्ते गजबजून गेले होते. युवकांबरोबरच महिलांचीही संख्या त्यात लक्षणीय होती. दुपारचे कडक ऊन असले, तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता. सकाळी सुरू झालेल्या पदयात्रा व फेऱ्यांचा दुपारच्या जेवणानंतर समारोप झाला. त्यानंतर पुन्हा सायंकाळपर्यंत उमेदवारांचा प्रचार सुरू होता. 

डेक्कन जिमखाना- वाकडेवाडी प्रभाग ११ मोठा असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी वाहनांतून प्रचारफेरीवर भर दिला. मात्र, अनेक ठिकाणी पायी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी सुरू होत्या. काही ठिकाणी उमेदवार येणार असल्याची वार्ताही रिक्षांतील ध्वनिवर्धकावरून देण्यात येत होती. त्यामुळे नागरिक गर्दीने त्यांना पाहण्यासाठी थांबले होते. 

कसबा पेठ- सोमवार पेठ प्रभागात पाचही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांशिवाय अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मंगळवार पेठ, कसबा पेठ, सोमवार पेठ आदी परिसरातील रस्तेही सकाळपासूनच कार्यकर्त्यांच्या फेऱ्यांमुळे व्यापून गेले होते. त्यातच शिवजयंती असल्यामुळे अनेक मंडळांनी पोवाडे सुरू ठेवले होते. उमेदवारांच्या पदयात्रा आल्या की, मंडळांकडून ध्वनिवर्धकावरून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसाठी उमेदवारांनी पाण्याची व्यवस्था  केली होती.

नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय

पदयात्रांवर अधिक भर 
नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन प्रभागातील बहुतेक उमेदवारांनी पदयात्रांवरच भर देऊन प्रचाराची सांगता केली. कार्यकर्त्यांच्या हातात पक्षांचे झेंडे, चिन्ह आणि त्यांनी दिलेल्या घोषणांनी प्रचार टिपेला पोचला होता. प्रभाग क्रमांक ३ विमाननगर-सोमनाथनगर, प्रभाग क्रमांक ४ खराडी-चंदननगर आणि प्रभाग क्रमांक ५ वडगाव शेरी-कल्याणीनगर या तीन प्रभागांत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे अशा सर्वच पक्षांचे उमेदवार या प्रभागांत असून, वाहन रॅलीपेक्षा प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोचण्यासाठी बहुतेक उमेदवारांनी पदयांत्रावरच भर दिला. विशेष म्हणजे चारही उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचार केला. पदयात्रेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी निरोपही पाठविले गेले होते. सकाळी पदयात्रांना सुरवात झाली. पक्षाचे झेंडे, चिन्ह असेलेली वाहने, त्यावर बसविलेल्या ध्वनिक्षेपक यंत्रणेतून होणारे आवाहन, हात उंचावित मतदारांना अभिवादन करणारे उमेदवार आणि त्यांचे मतदारांकडून होणारे स्वागत असे चित्र या प्रभागात होते.

धनकवडी क्षेत्रीय कार्यालय
 

रॅली अन्‌ वाहतूक कोंडी

रॅलीत उमेदवारांच्या मागे पक्षांचे झेंडे घेतलेले कार्यकर्ते... प्रचारासाठी धावणाऱ्या रिक्षा... कार्यकर्त्यांची घोषणाबाजी... मतदारांच्या व्यक्तिगत भेटी... रॅलीच्या गर्दीमुळे काही काळ होणारी वाहतूक कोंडी... अशा वातावरणात कात्रज, दत्तनगर, आंबेगाव पठार, धनकवडी, बालाजीनगर, राजीव गांधीनगर या भागांतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आज सायंकाळपर्यंत प्रचार केला. शिवजयंतीमुळे उमेदवारांनी सकाळीच चौकाचौकांत शिवपूजन करून प्रचाराच्या पदयात्रेस सुरवात केली. पक्षाचे नाव आणि चिन्ह असलेली उपरणे खांद्यावर, डोक्‍यावर टोप्या ठेवत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, महिला पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर यात भर देण्यात आला. भाजप, शिवसेना, मनसे, काँग्रेस, अपक्ष उमेदवार त्यांची प्रचार पत्रके वाटताना दिसत होती. प्रचाराचा शेवटचा दिवस तसेच रविवारी असल्याने प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने पदयात्रा काढलेली होती. त्यामुळे काही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या पदयात्रा एकमेकांसमोरही आल्या. प्रत्येकाचा भर अधिकाधिक भाग पिंजून काढण्याकडे होता. सर्वच पक्षांच्या पदयात्रा रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना गर्दीचा ‘सामना’ करावा लागला. प्रभागातील अगदी गल्लीबोळसुद्धा उमेदवारांनी पिंजून काढली. 

कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालय 

महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठी-भेटी घेण्यावर भर

प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने दिवसभरात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोचण्यासाठी पदयात्रा, कोपरासभा घेतल्या. तसेच, सायंकाळपासून प्रभागातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठी-भेटी घेण्यावर  भर दिला. 

बहुतांश सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचे काम वाटून घेतले होते. त्यामुळे प्रचारात एकत्र दिसणारे उमेदवार स्वतंत्ररीत्या मतदारांच्या भेटी घेत असल्याचे चित्र होते. त्यामुळे मतदान पॅनेल टू पॅनेल होणार की क्रॉस व्होटिंग होणार? याचीही चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. प्रभाग क्रमांक २४ हा संवेदनशील असल्याने पोलिसांनी तेथे मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मतांचे विभाजन कितपत होईल, त्याचा फायदा नक्की कोणाला होईल? याबाबत प्रभागात नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. भाजपची लाट या निवडणुकीत किती चालेल, याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com