प्रचारासाठी माहितीपटाचा ‘फंडा’

प्रचारासाठी माहितीपटाचा ‘फंडा’

पुणे - ‘हा आहे सक्षम उमेदवार’, ‘...याला म्हणतात विकास’, ‘आम्ही हे करूनच दाखवू’, असे ठासून सांगणाऱ्या माहितीपटाचे व्हिडिओ सध्या चांगल्याच गाजत आहेत. निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्याने आता सर्वत्र प्रचाराचे वारे जोरदार वाहू लागल्याचे दिसून येते. यात अनेक उमेदवारांनी आपल्या प्रभागाची माहिती देणारे, विकासाची दिशा सांगणारे...अन्‌ आपला निर्धार व्यक्त करणाऱ्या खास ‘माहितीपट’ बनवून घेतले असून ते चर्चेचा विषय ठरत आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार प्रचाराचे नानाविध फंडे आजमावून पाहत आहेत. त्यातीलच ‘माहितीपटा’चा हा फंडा मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. उमेदवारांनी एकापेक्षा एक सरस ठरतील असे लघुपट खास दिग्दर्शकांकडून तयार करून घेतले आहेत. आता हे लघुपट प्रभागात ठिकठिकाणी एलसीडी स्क्रीनवर दाखविले जात आहेत. त्यासाठी उमेदवारांनी लाखो रुपये मोजले आहेत.

प्रचारासाठी ‘करून दाखवले’, ‘याला म्हणतात विकास’, ‘सक्षम’ अशा शीर्षकाखाली हे माहितीपट तयार केले आहेत. काही उमेदवारांनी या माहितीपटाची निर्मिती व्यावसायिक एजन्सीज्‌कडून करवून घेतली आहे. याद्वारे प्रभागातील होतकरू कार्यकर्त्यांना अभिनयाची संधीही दिली आहे. त्याशिवाय काहींनी अभिनयासाठी रंगभूमीवरील कलाकारांनाही आमंत्रित केले आहे. सर्वच प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारी मिळवलेल्या उमेदवारांनी हे माहितीपट बनवण्याची ‘ऑर्डर’ खासगी एजन्सीज्‌ला दिली आहे. उमेदवारांबरोबरच काही संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मतदान जनजागृतीपर माहितीपटही बनवून घेतले जात आहेत.

‘माहितीपटा’साठी होऊ दे खर्च

‘‘एक मिनिटांपासून ते ४५ मिनिटांपर्यंतची माहितीपट बनविण्यासाठी साधारणतः ४० हजार ते दोन लाख रुपये खर्च येतो. यामध्ये प्रभागातील चित्रीकरणाबरोबरच एडिटिंग, व्हॉइस ओव्हर, डबिंग, मिक्‍सिंग आणि एडिटिंग स्टुडिओचा खर्च समाविष्ट आहे. सध्या विविध पक्षांतील १२ उमेदवारांच्या माहितीपटाचे काम पूर्ण केले आहे. हे माहितीपट तयार करण्यासाठी उमेदवारांची मुलाखत, जाहीरनामा याची माहिती घेतली जाते.,’’ असे माहितीपट तयार करणाऱ्या खासगी एजन्सीचे प्रमुख प्रवीण पगारे यांनी सांगितले.

निवडणुकीच्या रणधुमाळीतील वैशिष्ट्यपूर्ण ‘माहितीपट’
मनोरंजनाच्या माध्यमातून मतदानाविषयी जागृती करण्यासाठी ‘रिॲलिटी शो’मधील कलाकारांचे ‘माहितीपट’ तयार केले आहेत. हे माहितीपट शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि त्याशिवाय शॉपिंग मॉल, चित्रपटगृह, बाजारपेठ अशा वर्दळीच्या ठिकाणी दाखविण्यात येत आहेत.
चार सदस्यांचा एक प्रभाग असल्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मते द्यावी लागणार आहेत, मतदारांची गल्लत होऊ नये, यासाठी आवश्‍यक माहिती देणारी दोन मिनिटांची ‘व्हॉइस ॲनिमेशन फिल्म’ही सध्या गाजत आहे. त्यासाठी नावाजलेल्या अभिनेत्यांचा आवाज वापरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com