प्रचारासाठी ‘ओपन जीप’चे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

निवडणुकीच्या कालावधीत आमच्याकडे ‘मॉडीफाय’ करण्यासाठी जीप येतात. प्रत्येक उमेदवाराला त्याला हव्या त्या पद्धतीने आम्ही जीप तयार करून देतो. बसण्यासाठी जागा, जीपमध्ये उभे राहिल्यानंतर धरण्यासाठी अँगल, झेंडे, पक्षाचे चिन्ह बसविण्यासाठीची सोय असे अनेक बदल करावे लागतात. रंग हादेखील महत्त्वाचा भाग असतो. या जीप भाडेतत्त्वावरही मिळतात, साधारणतः दिवसाला दहा हजार रुपये इतके भाडे आकारले जाते. आमच्याकडे सध्या सात जीप ‘मॉडिफाय’ करण्याचे काम सुरू आहे.

-तहा उस्मान अरब, व्यवसायिक

पुणे - निवडणूक प्रचार आणि ओपन जीप हे समीकरणच झालंय... प्रचार यात्रेत जीपमध्ये उभा राहिलेला उमेदवार आणि त्यांचा नेता... अग्रभागी पक्षाचा झेंडा, चिन्ह आणि रंगाने सजविलेली जीप या वर्षीच्या निवडणूक प्रचाराचे आकर्षण ठरली नाही तरच नवल.

निवडणूक आली की ‘ओपन जीप’चे महत्त्व वाढते. विशेषतः महापालिका निवडणुकीत ही जीप अनेकांना हवी असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जास्त उमेदवार रिंगणात असतात. त्यामुळे तिला मागणीही राहतेच. म्हणूनच ‘मॉडिफाय’ करणाऱ्या गॅरेजमध्ये काही महिन्यांपूर्वीच जीप दाखल झाल्या. तर भाडेतत्त्वावर जीप देणाऱ्यांकडेही ‘बुकिंग’ सुरू झाले आहे. चार प्रभागांचा एक प्रभाग झाल्याने प्रभागाचे क्षेत्रफळ मोठे आहे. यामुळे प्रभागात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी पदयात्रा, मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रत्येक उमेदवाराचा प्रयत्न असला, तरी प्रचारादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या ‘रॅली’, उमेदवारी अर्ज दाखल करताना होणारे शक्तिप्रदर्शन यात जीपचे स्थान आता अढळ झाले आहे. प्रभागात प्रचारासाठी येणाऱ्या राज्यस्तरीय नेण्याकरिता ‘ओपन जीप’ हेच वाहन उपयुक्त ठरते. वातावरण निर्मितीकरिता हे वाहन अधिक उपयुक्त असल्याचा या पूर्वीच्या निवडणुकांतील अनुभव आहे.

Web Title: Campaigning for the Open Jeep attractions