बारामतीबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले...

Ajit-Pawar-Baramati
Ajit-Pawar-Baramati

बारामती : नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयानजिक कॅन्सर हॉस्पिटलसाठी 25 एकर जागेच्या शोधात आम्ही आहोत. चंद्रपूरच्या धर्तीवर हे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

बारामती तालुक्यातील काऱ्हाटीच्या कृषी मूल शिक्षण संस्थेलाही भरीव निधी दिला असून तेथेही उत्तम सुविधा विद्यार्थ्यांना देणार असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी दोनशे कोटी रुपयांची गरज आहे. त्यापैकी शंभर कोटी रुपयांची तरतूद करूनच आपण बारामतीला आलो, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.10) नागरी सत्काराला उत्तर देताना दिली होती.

पवार पुढे म्हणाले, ''बारामतीकरांनी भरभरुन प्रेम दिलेले आहे, मतदारांनी मते देऊन त्यांचे काम पूर्ण केलेले आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी असून ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने काम करू. आगामी काळात बारामतीच्या विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही देतानाच सर्व विकासकामांना गती दिली जाईल,'' हेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. पुरंदरच्या विमानतळासोबतच बारामती-फलटण रेल्वेमार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाबाबत बोलताना ते म्हणाले, विकासकामे करताना काही लोकांच्या जागा जाणार आहेत, याची जाणीव आहे. मात्र, विकास करायचा असेल, तर थोडं सोसावं लागेल. ज्यांच्या जागा जाणार आहेत, त्यांना चांगला दर मिळेल, याबाबत मी आणि सुप्रिया सुळे आम्ही प्रयत्न करू. 

पाणीपुरवठा योजनेलाही गती येणार

बृहत बारामती पाणीपुरवठा योजनेचा विस्तार आता 120 कोटींवरुन 200 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. बारामतीसाठी ही योजना होणे आगामी काळाच्या दृष्टीने गरजेचे असून ती वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही अजित पवार म्हणाले. 

अजितदादा पुन्हा एकदा झाले भावूक

बारामतीकरांनी केलेला हा सत्कार माझा वैयक्तिक नसून शहर, तालुक्यातील, कुटुंबातील प्रत्येकाचा आहे. मिरवणुकीदरम्यान शाळेतील मित्र भेटले, खूप आठवणी डोळ्यासमोरुन तरळून गेल्या. ज्यांच्यासमोर लहानाचा मोठा झालो, त्यांचा आशीर्वाद मिळाला. दिल्लीत माझं मताधिक्य ऐकून खासदारही कौतुक करायचे, तेव्हा उर भरून य़ायचा, असे सांगताना अजित पवार काहीसे भावूक झाले होते. मिरवणुकीत अनेकांना धक्काबुक्की सहन करावी लागल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com