Vidhan Sabha 2019 : पिंपरीत उमेदवारी बदलली आणि.... 

अविनाश म्हाकवेकर 
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पिंपरी मतदारसंघात अवघ्या 24 तासांत उमेदवार बदलण्याची नामुष्की राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शुक्रवारी (4 ऑक्टोबर)  ओढवली. उमेदवार का बदलला याची नेमकी कारणे पक्षाने स्पष्ट केलेली नाहीत...

पिंपरी (पुणे) : पिंपरी मतदारसंघात अवघ्या 24 तासांत उमेदवार बदलण्याची नामुष्की राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शुक्रवारी (4 ऑक्टोबर)  ओढवली. उमेदवार का बदलला याची नेमकी कारणे पक्षाने स्पष्ट केलेली नाहीत. गुरुवारी नगरसेविका सुलक्षणा धर यांनी उमेदवारी जाहीर झाली होती. तर आज माजी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली. दोन्ही उमेदवारांकडे एबी फॉर्म असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामती येथून बोलताना नेते अजित पवार यांनी माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडील फॉर्म अधिकृत असल्याचे सांगितले. त्यामुळे गेले 24 तास आनंदात असलेल्या सुलक्षणा धर-शीलवंत यांना अश्रू अनावर झाले. अशीच स्थिती कार्यकर्त्यांची झाली. तसेच याच्या उलट परिस्थिती बनसोडे व कार्यकर्त्यांमध्ये झाली. दरम्यान, नाव बदलण्याचा मोठा परिणाम मतांवर होण्याची शक्‍यता आहे. 

हा मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. येथून 2009 मध्ये राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे पहिले आमदार बनले. तर 2014 मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार विजयी झाले. आता युतीकडून पुन्हा चाबुकस्वार उमेदवार आहेत. आघाडीतर्फे ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर गुरुवारी दुपारी नगरसेविका धर यांना उमेदवारी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत यांच्या स्वाक्षरीचा एबी फॉर्म घेऊन शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते फजल शेख आदींनी धर यांच्या घरी जाऊन दिला. अभिनंदन केले. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज फॉर्म भरण्यासाठी किती वाजता जायचे, शक्तिप्रदर्शन ते प्रचारयंत्रणा कशी राबवायची याचे नियोजनही झाले. त्यामुळे धर यांच्यासह कार्यकर्ते कामाला लागले. रात्रभर जल्लोष सुरू होता. धर अभिनंदनाचे फोन स्वीकारत होत्या. 

पदाधिकारी गायब 
शुक्रवारी नियोजनाप्रमाणे माजी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह कार्यकर्त्यांसोबत धर निवडणूक कार्यालयात पोचल्या. त्याचवेळी त्यांची उमेदवारी रद्द केल्याचे वृत्त आले. त्यामुळे सगळेच गोंधळात पडले. त्यामुळे उमेदवार बदलाची अफवा असल्याची चर्चा सुरू झाली. काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याशी बारामती येथे संपर्क साधला असता ते म्हणाले, "धर यांची निवड चुकली, असे अनेकांचे फोन आले. त्यामुळे उमेदवारी बदलली.' यानंतर मात्र, वातावरण एकदम बदलले. धर यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांची स्थिती अवघड झाली. काल घरी येऊन अभिनंदन करणारे पदाधिकारी गायब होते. यामुळे धर यांना अश्रू अनावर झाले. 

खासगीतील दावा खरा ठरला 
दरम्यान, कालच्या यादीत उमेदवारी न मिळाल्याने बनसोडे प्रचंड नाराज झाले होते. तसेच त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, 24 तास उलटण्याच्या आतच त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली. खासगीत बोलताना ते आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावा मात्र, करत होते. त्यांचा दावा खरा ठरला. सकाळी त्यांच्या हातात एबी फॉर्म पडला आणि तत्काळ निवडणूक कार्यालय गाठत फॉर्म भरला. 

मतांवर परिणाम होणार? 
पडद्यामागे काय हालचाली झाल्या, पहिला आणि दुसरा निर्णय का घेतला, कोणामुळे, कशासाठी हे समजण्यास अजून काही दिवसांचा अवधी लागेल. या साऱ्यामध्ये पक्षाने घेतलेल्या निर्णयाने आपल्याच उमेदवार, कार्यकर्ते व नेत्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम मतांवर परिणाम होऊ शकतो हे निश्‍चित. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: candidate changed in pimpri assembly by ncp