तिकिटासाठी आलो ‘देवा तुझ्या दारी’!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

पुणे - ‘देवा मला पाव... तिकिटासाठी माझा नंबर लाव’, ‘आई भवानी तुझी कृपा असू दे’, ‘मल्हारी मार्तंडा तुझा आशीर्वाद असू दे आणि उमेदवारी मला मिळू दे,’ असे साकडे घालत इच्छुक उमेदवार देवदर्शन घेत आहेत. यात नवीन इच्छुकांपासून ते अनेक आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश आहे.  

पुणे - ‘देवा मला पाव... तिकिटासाठी माझा नंबर लाव’, ‘आई भवानी तुझी कृपा असू दे’, ‘मल्हारी मार्तंडा तुझा आशीर्वाद असू दे आणि उमेदवारी मला मिळू दे,’ असे साकडे घालत इच्छुक उमेदवार देवदर्शन घेत आहेत. यात नवीन इच्छुकांपासून ते अनेक आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश आहे.  

अनेक इच्छुक निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. मागील पाच वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर आपल्यालाच तिकीट मिळावे, अशी विद्यमान नगरसेवकांची इच्छा आहे, तर माजी नगरसेवकांनाही पुन्हा तिकीट मिळण्याची अपेक्षा आहे. धार्मिक कार्यक्रमांचे औचित्य साधून इच्छुक नागरिकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार व प्रचार ते करू लागले आहेत. निवडून आल्यावर इष्ट देवतांप्रती मावंद (महाप्रसाद) घालण्याची तयारी बहुतेकांनी दर्शविली आहे. कोणी पक्षश्रेष्ठींच्या कार्यालयात वारंवार भेटी देऊन आपले तिकीट पक्के करण्याच्या प्रयत्नात आहे, तर काहीजण मात्र थेट त्यांच्या श्रद्धास्थानांकडे आळवणी करीत आहेत. 

महापौर प्रशांत जगताप नुकतेच तुळजाभवानीचे आणि अजमेर शरीफ दर्ग्याचे दर्शन घेऊन आले. उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो; मात्र प्रत्येकाची श्रद्धास्थाने निरनिराळी आहेत. काहीजण तर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेटी देत असून, काहीजण आपापल्या श्रद्धास्थानांना भेटी देत आहेत. 

मंदिर, दर्गा अन्‌ चर्चमध्येही हजेरी  
मंदिर, दर्गा, चर्चमध्ये जाऊन तिकीट मिळावे म्हणून प्रार्थना करीत आहेत. तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी, जेजुरी येथील मल्हारी मार्तंड, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जोतिबा, कर्नाटकातील सौंदत्तीदेवी, अक्कलकोट, मुंगळे महाराज, तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा आदी ठिकाणांवर उमेदवार दर्शनासाठी जात आहेत. 

...माझेही कल्याण होऊ दे !  
जनतेचे कल्याण करायचे असून ते करताना माझेही कल्याण होऊ दे ! त्यासाठीच तिकीट मिळू दे ! अशी इच्छा मनी बाळगून अनेक इच्छुक देवदर्शनास जात आहेत, त्यामुळे सध्या या दौऱ्यांचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Web Title: candidate temple door visit for election ticket