उमेदवार ठरणार दोन दिवसांत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

पुणे - युतीबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी दोन दिवसांत प्रसिद्ध होणार आहे. तर, आघाडीमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असल्यामुळे त्यांचीही पहिल्या टप्प्यातील यादी येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. या याद्यांकडे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पुणे - युतीबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी दोन दिवसांत प्रसिद्ध होणार आहे. तर, आघाडीमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असल्यामुळे त्यांचीही पहिल्या टप्प्यातील यादी येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. या याद्यांकडे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारी प्रारंभ झाला. 3 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. भाजप- शिवसेना युतीबाबत गेल्या आठ दिवसांपासून चर्चा सुरू होती. परंतु, त्याबाबतचे चित्र गुरुवारी स्पष्ट झाले. त्यामुळे दोन्ही पक्षांतील पदाधिकारी आता याद्या तयार करण्याच्या तयारीला लागले आहेत. भाजपने पहिल्या टप्प्यातील 100 उमेदवारांची नावे प्रदेश कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविली आहेत. त्यात 25 विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. यादीला आज किंवा उद्या मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचे शहर भाजपकडून सांगण्यात आले. तर, शिवसेनेची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, सोमवारपर्यंत संपूर्ण उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी स्पष्ट केले.

आघाडीबाबत अनिश्‍चितता
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू आहे. परंतु, कोणी किती जागा लढवायच्या, यावर एकमत होत नसल्यामुळे आघाडीबाबत अनिश्‍चितता आहे. आघाडीचा निकाल अथवा जागावाटपाची प्रक्रिया येत्या शनिवारपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले. पक्षाची पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी दोन दिवसांत प्रसिद्ध करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसची पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी दोन दिवसांत प्रसिद्ध होणार असल्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. तर, शनिवारी काही उमेदवार जाहीर होऊ शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसेचे उमेदवार दोन दिवसांत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यादी दोन दिवसांत प्रसिद्ध होणार असल्याचे शहरप्रमुख हेमंत संभूस यांनी सांगितले. तर, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), एमआयएम यांचेही उमेदवार सोमवारपर्यंत जाहीर होतील.

प्रवेशासाठी "एबी फॉर्म'ची अट
चार विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उंबरठ्यावर पोचले आहेत; परंतु त्यांना उमेदवारीची खात्री हवी आहे. जर "बी फॉर्म' मिळणार असेल तर प्रवेश करू, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. "बी फॉर्म' थेट मिळविण्यासाठी अन्य पक्षांमध्येही काही इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत. तर, "बी फॉर्म' दाखल करण्याची मुदत 3 फेब्रुवारी असल्यामुळे अनेक जणांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

Web Title: The candidate will be declared in two days