स्पर्धा परिक्षा निवडीसाठी गुणांसह उमेदवाराचे कौशल्य देखील महत्त्वाचे - डॉ. अर्जुन देवरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Competition-Exam

पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. अर्जुन देवरे यांनी गुरुवारी 'सकाळ’च्या कार्यालयास भेट दिली.

स्पर्धा परिक्षा निवडीसाठी गुणांसह उमेदवाराचे कौशल्य देखील महत्त्वाचे - डॉ. अर्जुन देवरे

पुणे - ‘केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) घेण्यात येत असलेल्या इतर परीक्षांचा देखील विद्यार्थ्यांनी विचार करावा. स्पर्धा परिक्षा देण्यासाठी स्वतःची तयारी हवी. दुसरे काही करायचे नाही म्हणून स्पर्धा परिक्षा देवू नका. अपयश पचवायची तयारी ठेवत प्लॅन बी देखील हवा. तसेच निवड होताना गुणांसह उमेदवाराचे कौशल्य देखील महत्त्वाचे असतात,’ असा सल्ला पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जुन देवरे यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिला.

पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. देवरे यांनी गुरुवारी (ता. ६) ‘सकाळ’च्या कार्यालयास भेट दिली. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी त्यांचे स्वागत केले. २०१४ च्या बॅचचे आयएफएस असलेले डॉ. देवरे यांनी ब्राझील आणि पोर्तुगालमध्ये भारताचे राजनैतिक अधिकारी म्हणून काम केले आहे. आयएफएस परिक्षेच्या तयारीपासून कामाच्या अनुभवाबाबत त्यांनी संवाद साधला. डॉ. देवरे म्हणाले, ‘प्रशासकीय सेवेचे स्वरूप आता मोठ्या प्रमाणात बदलत आहे. सेवेत जबाबदारी आणि पारदर्शकता वाढत आहे. तसेच विविध क्षेत्रातील तरुण स्पर्धा परिक्षा देत आहे. त्यामुळे निवड होत असताना केवळ उमेदवाराचे गुण किती आहे हे पाहिले जात नाही. गुणांसह त्यात कोणती कौशल्य आहेत याचा देखील विचार केला जात आहे. काही तरी नवीन करायचे असेल. नव्या संधी उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर आयएफएस खूप चांगला पर्याय आहे. कारण परदेशात आपण देशाचे नेतृत्व करतो याहून मोठी अभिमानाची बाब नाही. आयएफएसबद्दल पूर्वी अनेकांना माहिती नव्हती. मात्र आता या परिक्षेबाबत सर्वत्र चर्चा होते व त्याची माहिती झाली आहे. देशाच्या बाहेर राहायला लागते म्हणून काही उमेदवार ही परिक्षा टाळतात.’

डॉ. देवरे म्हणाले...

- स्पर्धा परिक्षेसाठी स्वतःची तयारी हवी

- निवड होताना गुणांसह उमेदवाराचे कौशल्य देखील महत्त्वाचे असतात

- काही तरी नवीन करायचे असेल तर आयएफएस चांगली संधी

- अपयश आल्यास प्लॅन बी हवा

- अपयश पचवण्याची तयारी हवी

ब्राझीलमधील चांगल्या बाबी भारतात आणण्याचा प्रयत्न -

ब्राझीलमध्ये सर्वच बाबी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. एकूण जागेपैकी केवळ १० ते १२ टक्के जमीन तेथील नागरिक शेतीसाठी वापरत आहेत. आपल्यापेक्षा अडीचपट क्षेत्रफळ असलेल्या ब्राझीलची लोकसंख्या केवळ २२ कोटी आहे. तेथील साखर कारखानदारांमध्ये मोठी एकी आहे. तसेच तेथील बाजारपेठ ही ऊस उत्पादन आणि इथेनॉल एकमेकांशी जोडलेले आहे. त्यामुळे ते दोन्हींत समतोल साधतात. तिकडच्या चांगल्या बाबी भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतात इथेनॉल कसे वाढवता येईल याबाबत ब्राझीलबरोबर चर्चा सुरू आहे, अशी माहिती डॉ. देवरे यांनी दिली. ब्राझीलमधील विविध अनुभव देखील त्यांनी मांडले.