कॅंटोन्मेंटमध्ये सुविधांना प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पुणे - लष्करी अधिकाऱ्यांना नागरी क्षेत्रामध्ये काम करण्याची खूप कमी संधी मिळते. पुणे कॅंटोन्मेंटमध्ये पायाभूत सुविधा व स्वच्छतेला प्राधान्य देतानाच बांधकामासाठी चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून मिळावा, यासाठी पाठपुरावा केला. एकूणच वर्षभरातील कामगिरीबाबत समाधानी असल्याचे पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मावळते अध्यक्ष ब्रिगेडियर राजीव सेठी यांनी सांगितले. 

पुणे - लष्करी अधिकाऱ्यांना नागरी क्षेत्रामध्ये काम करण्याची खूप कमी संधी मिळते. पुणे कॅंटोन्मेंटमध्ये पायाभूत सुविधा व स्वच्छतेला प्राधान्य देतानाच बांधकामासाठी चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून मिळावा, यासाठी पाठपुरावा केला. एकूणच वर्षभरातील कामगिरीबाबत समाधानी असल्याचे पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मावळते अध्यक्ष ब्रिगेडियर राजीव सेठी यांनी सांगितले. 

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सेठी यांनी नुकतीच सोडली. यानिमित्त ‘सकाळ’शी बोलताना त्यांनी वर्षभरातील कारकिर्दीत केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि कॅंटोन्मेंट परिसर स्वच्छ व सुंदर करण्याबरोबरच येथील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे केली. शाळा आणि रुग्णालयांच्या आधुनिकीकरणासाठी ‘सीएसआर’मधून मदत मिळविली, हे त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य ठरले. बोर्डाच्या मराठी माध्यमाच्या शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्यावाढीसाठी प्रयत्न केले. प्रमुख रस्त्यांवर व इतर ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यास प्राध्यान्य दिले. मलनिस्सारण केंद्राचा गंभीर प्रश्‍न सोडविण्यात यश आल्याचे ब्रिगेडियर सेठी यांनी सांगितले. 

लष्कर परिसर हरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यास, तसेच उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे काम त्यांनी केले. रहदारीतील अडथळे दूर करण्यासाठी; तसेच बोर्डाच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने बोर्डाच्या हद्दीत ‘पे अँड पार्क’ योजनांना प्राधान्य दिले. शिवाजी मार्केटचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या.

मुक्तिधाम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी सुरू केली. धोबीघाट व गवळीवाडा येथील वसाहतीबाबत नव्याने प्रस्ताव तयार केला. बोर्डाच्या हद्दीत अनियमित व कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होतो आहे. याबाबत महापालिकेच्या सहकार्याने नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले असून ते लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले. 

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाची वर्षातील प्रमुख कामे 
रुग्णालयांचे आधुनिकीकरण
कयानी बेकरीवर कारवाई
मुक्तिधाम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी
परवडेल अशी आरोग्य सुविधा
बोर्डाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
कामगार महिलासांठी वसतिगृहास मान्यता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, घोरपडी मॅरेज हॉल, परमार हॉलचे नूतनीकरण

Web Title: cantonment utility rajiv sethi