सक्षम पीएमपी हाच उपाय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पुणे - शहरातील सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे निर्माण झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तब्बल ११ प्रकल्पांची घोषणा झाली असली, तरी त्यातील एकही प्रकल्प अल्पावधीत पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत पीएमपी सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्याकडे होणारे दुर्लक्ष रस्त्यावरील वाहनांची कोंडी वाढवत आहे. 

पुणे - शहरातील सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे निर्माण झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तब्बल ११ प्रकल्पांची घोषणा झाली असली, तरी त्यातील एकही प्रकल्प अल्पावधीत पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत पीएमपी सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्याकडे होणारे दुर्लक्ष रस्त्यावरील वाहनांची कोंडी वाढवत आहे. 

शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपी हा पर्याय आहे; परंतु लोकसंख्येच्या तुलनेत बसची संख्या अपुरी आहे, असलेल्या बसची आणि थांब्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या घटत आहे. परिणामी खासगी वाहनांची संख्या वाढत असून, त्यातून कोंडीत भर पडत आहे. पुणे आणि पिंपरी या दोन्ही शहरांची मिळून लोकसंख्या ५५ लाखांपेक्षा जास्त आहे. शहराबाहेरही सुमारे २० किलोमीटर अंतरावर पीएमपीची सेवा पुरविली जाते. तेथील लोकसंख्या सुमारे ३ ते ५ लाख आहे. त्यामुळे ६० लाख लोकसंख्येतून सध्या फक्त ११ लाख प्रवासी पीएमपीचा वापर करीत आहेत. हे प्रमाण किमान १८ लाखांपेक्षा अधिक हवे, असे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पीएमपीची बस खरेदी प्रक्रिया सुरू असून ती वेगाने पार पडेल, त्यासाठी तातडीने सूचना देण्यात येतील. तसेच जागा, देखभाल दुरुस्ती आदींबाबतही संबंधितांशी पुन्हा एकदा संवाद साधण्यात येईल. विकास आराखड्यातील पीएमपीसाठीच्या आरक्षित जागा मिळाव्यात, यासाठी दोन्ही महापालिकांना आदेश दिले जातील. 
- गिरीश बापट, पालकमंत्री

बसच्या वेळापत्रकाची अंमलबाजवणी काटेकोरपणे व्हायला हवी. तसेच, नव्याने सुरू केलेले मार्ग, मिनी बसचे मार्ग यांची पुरेशी माहिती प्रवाशांपर्यंत पोचलेली नाही. प्रवासी संख्या जास्त असलेल्या रस्त्यांवर  मोठ्या बसची आवश्‍यकता आहे. 
- त्र्यंबक धारूरकर, निवृत्त अधिकारी, पीएमपी

पीएमपीची बस थांब्यावर केव्हा येईल, हे निश्‍चित नसते. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि कष्टकरी गरज आणि इच्छा असूनही पीएमपीवर अवलंबून राहत नाहीत. बस वेळेवर धावल्यास विश्‍वासार्हता निर्माण होऊन पीएमपीचे प्रवासी वाढतील.
- संजय शितोळे, प्रवासी

प्रवासी संख्या, जास्तीत जास्त बस रस्त्यावर धावतील, ब्रेक डाऊनचे प्रमाण कमी करणे, प्रतिदिन बसची वाहतूक याबाबत पीएमपीने उद्दिष्टे निश्‍चित केली पाहिजेत. उद्दिष्टपूर्तीची प्रवाशांना नियमितपणे माहिती द्यायला हवी. त्यातून पीएमपी गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करीत आहे, अशी भावना प्रवाशांत निर्माण होईल आणि पीएमपीमध्येही सुधारणा होईल.
- रणजित गाडगीळ, परिसर संस्था 

Web Title: Capable PMP Traffic Issue