पाहुणा-पाहुण्यात मिटले अन्‌ पोलिसही सुटले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

आपल्या ओळखीच्या व्यक्तीची आणि आपली केव्हा तरी अपघाताने भेट होते, असे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात अनेकदा येतात. इथे मात्र याउलट घडले. भल्या पहाटे दोन कारच्या अपघातानंतर पोलिस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर एकमेकांशी चर्चा करताना दोघे कारचालक एकमेकांचे नातेवाईक निघाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.

पुणे : आपल्या ओळखीच्या व्यक्तीची आणि आपली केव्हा तरी अपघाताने भेट होते, असे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात अनेकदा येतात. इथे मात्र याउलट घडले. भल्या पहाटे दोन कारच्या अपघातानंतर पोलिस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर एकमेकांशी चर्चा करताना दोघे कारचालक एकमेकांचे नातेवाईक निघाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

एखाद्या चित्रपटातील घटनेप्रमाणे ही घटना शुक्रवारी घडली. पहाटे अडीचच्या सुमारास सेव्हन लव्हज चौकात दोन कारची समोरासमोर टक्कर झाली. त्यामध्ये दोन्ही कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. तेथे दाखल झालेल्या पोलिसांनी कारचालकांना लोहियानगर पोलिस चौकीत नेले. एकमेकांविरुद्ध तक्रार देताना आडनाव सारखेच असल्याचे दोघा कारचालकांच्या निदर्शनास आले. एकमेकांशी बोलल्यावर दोघे नातेवाईक असल्याचा उलगडा झाला.

आता नातेवाईकच निघाल्याने तक्रार दाखल करण्याचा प्रश्‍नच नव्हता. त्यानुसार, दोघांनीही आपली कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे पोलिसांना लिहून दिले आणि दोघेही निघून गेले. दरम्यान, भल्या पहाटे अपघाताचे प्रकरण आल्यामुळे आपली डोकेदुखी वाढणार, हे पोलिसांना कळले होते; परंतु दोन्ही कारचालक एकमेकांचे नातेवाईक निघाल्याने आणि त्यांनी तक्रार न दिल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car Accident near Sevan Loves in pune