
विविध बॅंकांच्या एटीएम केंद्रांमध्ये स्किमर व डिजिटल मायक्रो कॅमेरा लावून बनावट डेबिट कार्ड बनवून (कार्ड क्लोनिंग) त्याद्वारे नागरिकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपये लुटणाऱ्या एका टोळीतील दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांच्या पथकाने अटक केली. संबंधित आरोपींनी पुणे, मुंबई यासह अन्य जिल्ह्यांमध्ये याच पद्धतीने कार्ड क्लोनिंगद्वारे नागरिकांचे पैसे काढले आहेत.
पुणे - विविध बॅंकांच्या एटीएम केंद्रांमध्ये स्किमर व डिजिटल मायक्रो कॅमेरा लावून बनावट डेबिट कार्ड बनवून (कार्ड क्लोनिंग) त्याद्वारे नागरिकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपये लुटणाऱ्या एका टोळीतील दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांच्या पथकाने अटक केली. संबंधित आरोपींनी पुणे, मुंबई यासह अन्य जिल्ह्यांमध्ये याच पद्धतीने कार्ड क्लोनिंगद्वारे नागरिकांचे पैसे काढले आहेत. आरोपींकडून १३ एटीएम स्किमर, १२ कॅमेऱ्यांसह तब्बल साडेतीनशे बनावट डेबिट कार्ड जप्त करण्यात आले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महम्मद अकिल आदिल भोरनिया (वय ३७), महम्मद फैजान फारुख छत्रीवाला (वय ३७, दोघेही रा.डोंगरी, मुंबई) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेनिस सुसेराज मायकल (वय ३२, रा. हडपसर) यांनी बॅंक खात्यातील एक लाख रुपये अनोळखी व्यक्तींनी काढून घेतल्याची फिर्याद सायबर पोलिसांकडे दिली होती.
सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ, अमित गोरे, संदेश कर्वे, अस्लम अत्तार, शिरीष गावडे, अनिल पुंडलिक, नितीन चांदणे यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे आरोपींना नाशिक येथून अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून ३५९ बनावट डेबिट कार्ड, १३ एटीएम स्कीमर डिव्हाईस, १२ डिजिटल मायक्रो कॅमेरे व मुद्देमाल जप्त केला.
रेशन दुकानांमध्ये तांदळाचा तुटवडा, डाळीही गायब
आरोपीचा दोन वर्षे दुबईत मुक्काम
आरोपी महम्मद भोरनीया हा अल्पशिक्षित आहेत. तर महम्मद छत्रीवालाने इलेक्ट्रॉनिक डिप्लोमाचे शिक्षण घेतले आहे. त्याने इतर साथीदारांच्या मदतीने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, हिमाचल प्रदेश, हैदराबाद व गुजरात या ठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने मुंबईतील मुंब्रा व कळवा येथे याच पद्धतीचा गुन्हा केला होता. त्यात मिळालेल्या पैशांचा उपयोग करून तो नेपाळमार्गे दुबईला पळून गेला होता. मागील वर्षी तो पुन्हा मुंबईत आला.
गळफास घेतलेला मृत्यूदेह आढळला; पण पोलिसांनी नोंद केली आकस्मात मृत्यूची
चोरीची पद्धत
आरोपी एटीएम केंद्रात डेबिट कार्ड स्वाईप करण्याच्या ठिकाणी स्किमर लावत होते. कार्डचा पीन क्रमांक मिळविण्यासाठी पिन क्रमांक टाकण्याच्या बटणांच्या वरील बाजूला डिजिटल मायक्रो कॅमेरा लावत होते. आरोपी त्यांच्याकडील कलर प्रिंटद्वारे बनावट एटीएम कार्ड तयार करत. अशा पद्धतीने आरोपींकडून कार्ड क्लोनिंग केलेल्या कार्डद्वारे पैसे काढले जात होते.
Edited By - Prashant Patil