आरोग्यदायी ‘आशा’

ज्ञानेश्वर रायते
शनिवार, 26 मे 2018

बारामती - बारामतीत शुक्रवारी (ता. २५) एक दुग्धशर्करा योग अगदी योगायोगाने आला. हाडाच्या शेतकऱ्याची, त्यातही दूध उत्पादकाची मुलगी जी नेदरलॅंडची आज उपपंतप्रधान आहे, अन ज्या देशात सायकलीवर सर्वांचाच भर आहे, त्या कॅरोला स्काऊटेन यांनी व ज्यांनी महिलांना राजकीय, सामाजिक, शासकीय स्तरावर बरोबरीचे स्थान दिले, त्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी मिळून सायकलीवर अप्पासाहेब पवार सभागृहाला फेरफटका मारला.

निमित्त होते, ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांतून बारामती लोकसभा मतदारसंघातील आशा स्वयंसेविका व दूर अंतरावरून शाळेत चालत येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी १० हजार सायकलींच्या वितरणाच्या प्रारंभाचे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात येत्या काही दिवसांत आशा स्वयंसेविका ‘गुलाबी’ सायकलीवरून दिसणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात बायसिकल बॅंक सुरू करण्यात आली असून, आशा व विद्यार्थिनींसाठी ‘टु व्हिल्स ऑफ होप’ हे अभियान चालविले जात आहे. या अभियानाच्या संकेतस्थळाचे अनावरण नेदरलॅंडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन यांच्या हस्ते झाले. या वेळी आशा सेविका व विद्यार्थिनींना स्काऊटेन व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले. शारदानगर येथे ४५० सायकली वितरित करण्यात आल्या. एकाच वेळी बारामती लोकसभा मतदारसंघात १० हजार सायकलींचे वितरण होणार असल्याने या कार्यक्रमासाठी खास हिरो कंपनीच्या सायकलीचे निर्माते पंकज मुंजाळ बारामतीत आले होते. शारदानगर येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, सुनंदा पवार, रणजित पवार, हिरो कंपनीचे संचालक पंकज मुंजाळ, जगदीश भट्टर आदी उपस्थित होते. आशा सेविका या आरोग्य सेवेसाठी कष्ट करतात. त्या आशांसाठी ही सायकल असेल. बारामती लोकसभा मतदारसंघात पुढील वर्षापर्यंत सर्वांना हक्काची सायकल मिळेल. सायकली अगदी योग्य व्यक्तींपर्यंत पोचणार आहेत. या शिवाय अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांना अजित पवार यांच्या प्रयत्नांतून टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमर्फत कर्करोग तपासणी व ॲनिमियाचे हेल्थ कार्ड मिळणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामतीत महिला सबलीकरणावर खूप भर दिला जातो. यामागे शरद पवार यांचे खूप मोठे योगदान आहे. मी स्वतःही हे पाहिले, पाहते आहे. सायकल वितरणाचे कौतुक वाटते.
- कॅरोला स्काऊटेन, उपपंतप्रधान, नेदरलॅंड 

बारामती लोकसभा मतदारसंघात १० हजार सायकली वितरित होतील. या सायकली अगदी मालकीच्या नसतील. विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ती दुसऱ्या मुलीकडे हस्तांतरित करेल. त्यामुळे याचे रोटेशन होईल. 
- शरद पवार, ज्येष्ठ नेते

Web Title: Carola Schouten cycle distribution supriya sule health