
पुणे : गॅस एजन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास बॅंकेपेक्षा जादा परताव्याचे आमिष दाखवून पाच कोटी ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यासह त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंगेश जगदीश खरे (रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून श्रीराम गॅस एजन्सीचे मालक मयुरेश उदय जोशी आणि उदय त्र्यंबक जोशी (रा. दांडेकर पूल) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार बांधकाम ठेकेदार असून, मयुरेश यांची श्रीराम गॅस एजन्सी आहे. उदय जोशी यांनी फिर्यादी खरे यांना त्यांचा मुलगा मयुरेशच्या गॅस एजन्सीत रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा जादा परतावा देऊ, असे आमिष दाखवले होते.
त्यावर खरे यांनी श्रीराम गॅस एजन्सीच्या बँक खात्यात १४ लाख रुपये ऑनलाइन जमा केले. खरे यांच्यासह नउजणांनी एकूण पाच कोटी ५३ लाख हजार रुपये गुंतविले होते. परंतु जोशी यांनी गुंतवणूकदारांना कोणताही परतावा दिला नाही. तसेच, रिझर्व्ह बॅंकेचा कोणताही परवाना नसताना वार्षिक १२ टक्के व्याजाच्या बनावट मुदतठेव प्रमाणपत्र देवून फसवणूक केली, अशी तक्रार खरे यांनी पोलिसांत दिली.