बारावीच्या फेरपरीक्षेला बसले तोतया विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

बारावीच्या फेरपरीक्षेमध्ये इंग्रजी भाषेच्या पेपर देण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या जागी तोतया विद्यार्थ्यांना परिक्षेस बसविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शुक्रवारी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामध्ये (बीएमसीसी) घडला. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दोन विद्यार्थ्यांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे : बारावीच्या फेरपरीक्षेमध्ये इंग्रजी भाषेच्या पेपर देण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या जागी तोतया विद्यार्थ्यांना परिक्षेस बसविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शुक्रवारी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामध्ये (बीएमसीसी) घडला. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दोन विद्यार्थ्यांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिलीप दत्तात्रय भालेराव (वय 20), प्रसाद अशोक शिंदे (वय 20), अनिकेत अण्णासाहेब नाणेकर (वय 20, तिघेही रा. नाणेकरवाडी, चाकण), शुभम लहु कदम (वय 20, रा. मोशी गाव, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) उपप्राचार्यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्यात येते. त्यानुसार शुक्रवारी इंग्रजी भाषेच्या पेपरसाठी फेरपरीक्षा घेण्यात आली. 'बीएमसीसी'मध्येही परीक्षेचे केंद्र असल्याने तेथे शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी दिड या वेळेत परिक्षा सुरू होती. त्यावेळी 13 क्रमांकाच्या खोलीमधील परिक्षार्थी विद्यार्थी दत्तात्रय भालेराव व खोली क्रमांक परीक्षार्थी विद्यार्थी अनिकेत नाणेकर यांनी तोतया विद्यार्थी प्रसाद शिंदे व दत्तात्रय भालेराव यांच्यासमवेत संगनमत केले. इंग्रजी भाषेचा पेपर सोडविण्यासाठी प्रसाद शिंदे याने दत्तात्रय भालेराव असल्याचे, तर शुभम कदम याने अनिकेत नाणेकर असल्याचे भासविले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ए.आर.महाजन करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against four for using fake students appearing for the 12th exam