
Crime News : जमीन खरेदी फसवणूक प्रकरणी सख्खा भाऊ, जावई व पुतण्यावर गुन्हा दाखल
जुन्नर : जमीन खरेदीत फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून सख्खा भाऊ,भावाचा जावई व पुतण्या यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे जुन्नर येथील अब्दुलगफार सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी इब्राहिम सय्यद, ताबीश शेख व जुबेर सय्यद यांचे विरोधात संगनमताने आर्थिक फसवणूक करणे, शिविगाळ, दमदाटी करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अब्दुल गफार सय्यद हे ओमान येथे नोकरीस असताना त्यांनी २०१२ मध्ये जुन्नर येथे भागीदारीत जमीन घेण्यासाठी त्यांचे जुन्नर येथील भाऊ इब्राहिम सय्यद व भावाचे जावई ताबीश शेख रा. मुंबई यांच्याकडे २५ लाख रुपये दिले होते. ताबीश शेख व अब्दुल गफार सय्यद यांच्या नावावर जमीन घेण्याचे ठरले होते.
त्यानंतर जुन्नर जवळ सोमतवाडी येथील गट नं ११/१ ही जमीन खरेदी करण्यात आली. अब्दुल गफार सय्यद यांनी या जमिनीचा सातबारा उतारा काढला असता त्यावर त्यांच्या नावाऐवजी भाऊ इब्राहिम सय्यद यांचे नाव असल्याने दोघांत वाद झाला. या वादात पुतण्या जुबेर सय्यद याने शिविगाळ , दमदाटी केल्याचे अब्दुल गफार सय्यद यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार पुढील तपास करत आहेत.