धसईचा कॅशलेस पॅटर्नः नवी अर्थक्रांती

धसईत कॅशलेस व्यवहार सुरू आहेत.  (छायाचित्र - प्रशांत सावंत)
धसईत कॅशलेस व्यवहार सुरू आहेत. (छायाचित्र - प्रशांत सावंत)

सर्वप्रथम कॅशलेस झालेले ठाणे जिल्ह्यातील धसई गाव देशासाठी प्रेरणादायी आहे. तेथील ग्रामस्थ हळूहळू कॅशलेस व्यवहारांशी समरस होत आहेत. गावाने कॅशलेसकडे घेतलेली झेप, त्यातून शेजारच्या पालघर जिल्ह्यातील गावांनी घेतलेला आदर्श आणि या गावामुळे महाराष्ट्राने कॅशलेसकडे सुरू केलेली वाटचाल याचा आढावा.   
 

पारंपरिक बॅंकिंगच्या पलीकडे जाऊन ठाणे जिल्ह्यातील धसई गाव १०० टक्के कॅशलेस झाले. देशातील असे हे पहिलेच गाव. त्याचे नाव झाले. मानही मिळाला. हा धसई पॅटर्न  इतर जिल्ह्यांमध्ये राबवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला डिजिटल अर्थव्यवस्थेकडे नेऊन महाराष्ट्राला देशातील पहिले ‘कॅशलेस राज्य’ करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने सोडला आहे.

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्‍यातील जवळपास दहा हजार लोकसंख्येचे धसई गाव. ते गेल्या महिन्यात प्रकाशझोतात आले. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी गावात कॅशलेस व्यवहारांचा श्रीगणेशा झाला. धसईतील ग्रामस्थांचे जनधन खाते आहे. त्यामुळे प्रत्येक खातेधारकाकडे डेबिट कार्ड होते. कॅशलेस व्यवहारांसाठी डेबिट कार्डाचा उपयोग झाला. गावातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही बॅंकिंग यंत्रणेशी जोडण्यात आले. कॅशलेस धसईसाठी ‘बॅंक ऑफ बडोदा’ने मोहीम हाती घेतली. 

स्थानिक प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने गावातील दुकानदारांची बॅंकेत चालू खाती उघडण्यात आली. त्यांना कार्ड स्वाईप मशीन देण्यात आली. धसईत वडापाव विक्रेत्यापासून, औषधविक्रेते, सराफ, भाजीविक्रेते, मटण-मच्छी विक्रेते, दूधविक्रेते, हलवाई असे जवळपास १५० छोटे-मोठे व्यावसयिक आहेत. साधारण महिनाभरात निम्म्याहून अधिक व्यापाऱ्यांना स्वाईप मशीन देण्यात आली. उर्वरित व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना टप्प्या-टप्प्याने मशीन देण्यात येणार आहेत. 

धसईचा पडसाद
‘कॅशलेस धसई’चे अनुकरण करत पालघर जिल्ह्याधिकाऱ्यांनीही केळवे आणि माहीम ही दोन गावे कॅशलेस करण्याची मोहीम हाती घेतली आहे. केळवे आणि माहीममध्ये नुकताच डिजीधन मेळावा झाला. त्यात नागरिकांबरोबरच बॅंका, ई-वॉलेट, टेलिकॉम, नेटवर्क कंपन्या, आधारशी संलग्न भरणा (एईपीएस), विक्रेते, व्यापारी संघटना, शिधावाटप दुकानदार सहभागी झाले. कॅशलेस व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी ‘लकी ग्राहक योजना’ व व्यापाऱ्यांसाठी डिजीधन व्यापार योजनेंतर्गत या उपक्रमाची शासकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली. 

दोन्ही गावांत कॅशलेसबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली. सरकारी कर्मचारी आणि बॅंक कर्मचारी ग्रामस्थांच्या घरी गेले. त्यांना कॅशलेसचे महत्त्व पटवून दिले. बॅंक खाते उघडणे, रुपे डेबीट कार्ड वाटप, व्यावसायिकांची चालू खाती उघडणे, त्यांना स्वाईप मशीन आणि ‘क्‍यूआर कोड’संदर्भात माहिती देणे आदी उपक्रम राबवण्यात आले. केळवे-माहीम गाव पर्यटनस्थळ आहे. तेथील पेट्रोल पंप, हॉटेल, रिसॉर्टस्‌, चहाच्या टपऱ्या, फेरीवाले; तसेच चौपाटीवरील विक्रेत्यांना रोकडरहित व्यवहाराची साधने देण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटकांनाही कॅशलेस व्यवहार करणे शक्‍य होणार आहे. 

‘कॅशलेस‘ संकल्पनेतील महत्त्वाचे घटक असलेल्या बॅंकांचा पुढाकार आणि पायाभूत सेवा-सुविधांबरोबरच नागरिकांनी तितक्‍याच उत्साहाने सहभाग घेतल्यास ‘कॅशलेस महाराष्ट्र’ हे ध्येय लवकर गाठता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com