जातीचा दाखला ही वंचितांसाठी एक लढाई : महादेव जानकर

Caste Certificate is a battle for some peoples says Mahadev Jankar
Caste Certificate is a battle for some peoples says Mahadev Jankar

केडगाव, जि.पुणे : गावकुसाबाहेर राहणारे अनेक वर्षे जातीच्या दाखल्यांपासून वंचित आहेत. जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड मिळविणे म्हणजे यांच्यासाठी एक लढाई असते. पण ही लढाई सोपी करण्यासाठी मी मंत्रिमंडळात प्रयत्न करीन. जातीचे दाखले मिळवून देतो म्हणजे आम्ही तुमच्यावर मेहरबानी करत नाही. तुमच्यामुळे आम्ही सत्तेवर आहोत, असे दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी चौफुला ( ता.दौंड ) येथे सांगितले. 

महाराजस्व अभियानअंतर्गत अनुसूचित, विमुक्त व भटक्या जाती-जमातीच्या नागरिकांना जातीचे दाखले देण्याचे शिबिर चौफुला ( ता.दौंड ) येथे आयोजित करण्यात आले. त्यावेळी जानकर बोलत होते. शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी दहा जणांना जातीचे दाखले देण्यात आले. नंदीवाले, देऊळवाले, मरीआई, वडारी, नवबौद्ध आदी समाजातील १८०८ जणांनी जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केले. यावेळी आमदार राहुल कुल, प्रातांधिकारी संजय आसवले, तहसीलदार बालाजी सोमवंशी उपस्थित होते.  

जानकर म्हणाले, समाजातील वंचितांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे. दोन महिन्यात अधिकारी तुमच्याकडे येऊन सरकारच्या विविध योजना सांगतील. जातीच्या दाखल्यासाठी एकमेकांना मदत केली पाहिजे. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. सरकारने भटक्या - विमुक्तांच्या योजनांचे अनुदान वाढविले आहे. योजना समजून घ्या. राज्य सरकार मदत करीन.

आमदार कुल म्हणाले, उपेक्षित समाजाला जातीचे दाखले मिळावेत ही अनेक दिवसांची मागणी होती. दाखल्यांअभावी त्यांना सरकारच्या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. तपासणी करून सर्वांना दाखले देण्यात येतील. या शिबिरात दिलेले जातीचे दाखले हे जात पडताळणीत टिकले पाहिजे. इतकी त्याची काळजी घेतली जाणार आहे. शैक्षणिक कारणासाठी लागणारे दाखले प्राधान्याने देण्यात येतील. यावेळी प्रातांधिकारी संजय आसवले व तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी शासनाकडून हे दाखले मिळण्यासाठी संपुर्ण सहकार्य केले जाईल असे यावेळी स्पष्ट केले.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com