जातीनिर्मूलनाचा विचार गांभीर्याने करणे गरजेचे : रमेश पांडव

बाबा तारे
बुधवार, 20 जून 2018

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या परिसंवादाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार होते. मात्र, कॅबिनेट बैठकीमुळे त्यांना उपस्थित राहता न आल्याने त्यांनी आपला लिखित संदेश आयोजकांना पाठवला. जातीअंताच्या लढाईत सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचा संदेश यात देऊन परिसंवादाच्या आयोजकांना शुभेच्छाही दिल्या.

औंध : "जातीपातीची बंधने झुगारुन व जातीची उतरंड सारुन जोपर्यंत आपण माणूस म्हणून एकत्र येणार नाहीत. तोपर्यंत जात ही जाणार नाही. आजपर्यंत अनेक महापुरुषांनी यासाठी कार्य केले. त्यांना काही प्रमाणात यशही आले. तरीसुध्दा स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही आपल्या देशातील जाती व्यवस्थेचे समूळ निर्मूलन का होऊ शकले नाही? याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र सामाजिक समरसता मंचाचे निमंत्रक रमेश पांडव यांनी व्यक्त केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बहुजन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जातीभेद मुक्त विकसित भारत' या राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी, अध्यासन प्रमुख डॉ.सुनिल भंडगे, डॉ.गौतम बेंगाळे इत्यादी उपस्थित होते. पुढे बोलताना पांडव म्हणाले, "अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात संतांपासून ते देशासाठी लढलेल्या समकालीन व अगोदरच्या सर्वच महापुरुषांचा, उपेक्षित समाज, स्त्रिया, कामगार या सर्वांचा उल्लेख करुन त्यांची सुख-दुःख आपल्या साहित्यातून मांडली असून त्यामुळे त्यांच्या विचारात सर्वसमावेशकता असल्याचे जाणवते, असा सर्वसमावेशक विचार सर्वांनी केला तर जातिभेदांना या देशात थारा राहणार नाही व तेव्हाच देशाचा विकास शक्य होईल.

तसेच जाती-जातीतील बुरुज व आधुनिक युगातील नवीन रंग घेऊन येणारा जातीवाद संपवण्यासाठी सुक्ष्मपणे कार्य करणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात जाऊन यासाठी नवनवीन प्रयोग करावे लागणार आहेत. त्यासाठी आपली जात सोडून प्रत्येकाला पुढे यावे लागेल, असेही ते म्हणाले. 

कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यावेळी बोलताना म्हणाले, "काही जातींना शिक्षणापासून दूर ठेवल्याने त्यांचा विकास खुंटला. मात्र, जे यातून शिकले ते पुढे गेले. सर्वसमावेशक विकास घडवायचा असेल तर जातीनिर्मूलन करणे गरजेचे आहेच. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असून शिक्षणानेच जातीभेदाच्या भींती नष्ट होतील आणि शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठ हे एक माध्यम आहे व येथे शिक्षण घेऊन सर्वांनी विकास साधावा. देशातील जातीनिर्मूलन होईलच परंतु आधी ही सुरवात विद्यापीठातून करु." परिसंवादाचे प्रास्ताविक डॉ.सुनिल भंडगे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रशांत साठे यांनी केले.

परिसंवादात यांनी मांडले आपले विचार 

हैदराबाद विद्यापिठातील डॉ.भीमराव भोसले यांनी 'जातीभेदमुक्त विकासामध्ये सामाजिक समता,समानता व समरसतेची भूमिका'यावर,आयआयटी पवई येथील डॉ.वरदराज बापट यांनी 'भारतीय आर्थिक विकासामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काल,आज आणि उद्या' यावर विचार मांडले.

औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील प्रा.डॉ.क्षमा खोब्रागडे यांनी 'जातीभेदमुक्त विकासामध्ये सामाजिक पर्यावरणाची दिशा',प्राचार्य अनिरुध्द देशपांडे यांनी 'जातीअंताचे योग्य निधान-संविधान' तर नवी दिल्ली विद्यापीठाचे डॉ.देवेंद्र सिंग यांनी 'विकासात्मक राजनीती व जातीव्यवस्था -परस्पर संबंध' यावर या परिसंवादात आपले विचार मांडले.

Web Title: Casteism should be considered seriously says Ramesh Pandav