कलिंगड पिकात शेतकऱयांनी सोडली गुरे...

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 11 एप्रिल 2018

सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या बाजारभावाकडे लक्ष दिले पाहिजे. शेतकरी वैतागून गेला आहे. नोकरी मिळत नाही म्हणून शेती करण्यास सुरवात केली; पण शेतीतूनही काही मिळत नाही. कर्ज वाढणार आहे. शेतकऱ्यांचा अंत न पाहता सरकारने कलिंगड उत्पादकांना नुकसानभरपाई दिली पाहिजे.
- प्रवीण टेमकर, शेतकरी

मंचर (पुणे): बाजारभाव मिळत नसल्याने फ्लॉवर, टोमॅटो व कांदा यापाठोपाठ शेतकऱ्यांनी कलिंगड पिकातही गुरे सोडण्यास सुरवात केली आहे. आंबेगाव तालुक्‍यातील 40 गावांतील 300 हून अधिक कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तीन रुपये प्रतिकिलोला बाजारभाव आहे. कलिंगड तोडणीची मजुरी व वाहतूक खर्चही भागत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शेतकरी अभियंता प्रवीण सुभाष टेमकर व सुरेश नामदेव टेमकर यांना नोकरी मिळत नसल्याने शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वडिलोपार्जित शेती फारच कमी असल्याने त्यांनी अवसरी फाट्याजवळ सुरेश लक्ष्मण भोर यांची एक एकर जमीन खंडाने घेतली. उन्हाळ्यात कलिंगड पिकाला चांगली मागणी असते म्हणून त्यांनी स्वतः रोपे तयार करून रोपांची लागवड फेब्रुवारी महिन्यात केली. त्या वेळी कलिंगडाला 9 ते 10 रुपये बाजारभाव होता. कलिंगडाची चांगली वाढ झाली होती. दहा टन उत्पादन अपेक्षित होते. शेतीची मशागत, पाणी व्यवस्थापन, मजुरी, औषधे, खते असा जवळपास 80 ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला. कलिंगड तोडणीचा निर्णय घेतल्यानंतर प्रतिकिलोला तीन रुपयांपेक्षा अधिक बाजारभाव मिळत नव्हता. त्यामुळे नाइलाजाने टेमकर यांनी बुधवारी (ता. 11) कलिंगड पिकात गुरे सोडली आहेत.

दरम्यान, आंबेगाव तालुक्‍यात शेतीला शाश्वत पाणी मिळत असल्याने उन्हाळ्यात कलिंगड पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. घोडेगाव, लाखणगाव, वळती, गावडेवाडी, वडगाव काशिंबेग, कळंब, चांडोली खुर्द, भागडी, खडकी, शिंगवे, देवगाव, नारोडी, साकोरी, भराडी आदी चाळीस गावांत जवळपास 400 एकर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कलिंगड पीक घेतले आहे. कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. यात्रेत बैलगाडा शर्यती बंद आहेत. तसेच लग्नाच्या तिथी कमी आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये कलिंगडाला मागणी नसल्याची माहिती मंचर व घोडेगाव येथील व्यापाऱ्यांनी दिली.

Web Title: The cattle left by the farmers in watermelon in manchar